मुंबई : अभियांत्रिकी, वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्यासह देशातून तब्बल ७ लाख ६४ हजार ९७१ अर्ज आले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी असलेल्या पीसीएम गटासाठी ४ लाख ६३ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज पुणे व मुंबईतून तर, सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्गातून प्राप्त झाले आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणारी एमएचटी सीईटी परीक्षा दोन गटात घेण्यात येते. यामध्ये अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) आणि वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटांतर्गत परीक्षा घेण्यात येते. परीक्षांसाठी झालेल्या अर्ज नोंदणी प्रक्रियेमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे अधिक कल असल्याचे दिसून येते.

एमएचटी सीईटीसाठी करण्यात आलेल्या नोंदणीमध्ये अभियांत्रिकीसाठी पुण्यातून सर्वाधिक ५७ हजार ४२५ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल मुंबईतून ३९ हजार ५५५ विद्यार्थ्यांनी, नागपूरमधून ३० हजार ५०३ आणि नाशिकमधून २९ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अभियांत्रिकीप्रमाणे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सुद्धा पुण्यात सर्वाधिक २६ हजार ४४६ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये २१ हजार ८५३, मुंबई १७ हजार ५८९, छत्रपती संभाजी नगर १६ हजार १३६ आणि नागपूर १६ हजार १०९ इतके अर्ज आले आहेत.

सिंधुदुर्गातून सर्वात कमी अर्ज

अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सिंधुदुर्गातून सर्वात कमी अर्ज आले आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सिंधुदुर्गातून १ हजार २७९ अर्ज आले आहेत. तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी १ हजार ९२५ अर्ज आले आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी हिंगोलीतून सर्वाधिक कमी १ हजार ४९५ अर्ज आले आहेत. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनीही सीईटीला पसंती दिलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातून पीसीबीसाठी २४२५ आणि पीसीएमसाठी ३०३८; तर रायगड जिल्ह्यातून पीसीबीसाठी ३००७ आणि पीसीएमसाठी ५५६५ एवढेच अर्ज दाखल झाले.

सर्वाधिक अर्ज नोंदणी केलेले जिल्हे

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे करण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर आणि नागपूर या जिल्ह्यांतून एमएचटी सीईटीसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.

परराज्यातून ३२ हजार अर्ज

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातून ३२ हजार २२९ इतके अर्ज आले आहेत. त्यात पीसीएम गटासाठी ३० हजार ८९५ अर्ज असून, नवी दिल्लीतून सर्वाधिक ५ हजार ८८३ अर्ज आले आहेत. तर सर्वात कमी (२८६) अर्ज पणजीतून आले आहेत. तसेच पीसीबी गटातून १ हजार ३३४ अर्ज आले आहेत. सर्वाधिक अर्ज नवी दिल्लीतून (१९२) आणि पटणामधून १७५ अर्ज आले आहेत. तर सर्वात कमी अर्ज (२४) हे जम्मूतून आले आहेत.

परीक्षा कधी ?

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणारी एमएचटी सीईटी परीक्षा दोन गटात घेण्यात येते. यामध्ये अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिलदरम्यान, तर वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिलदरम्यान होणार आहे.

जिल्हा वैद्यकीय अभियांत्रिकी

पुणे २६,४४६ ५७,४२५

मुंबई १७,५८९ ३९,५५५

नाशिक २१,८५३ २९,७१५

नागपूर १६,१०९ ३०,५०३

छत्रपती संभाजीनगर १६,१३६ २१,१७४

अहिल्यानगर १६,०७६ २०,३८५

ठाणे १२,१९४ २३,२१३

लातूर १४,५३६ १४,७१५

कोल्हापूर ९७७८ १६,०७६

सिंधुदुर्ग १२७९ १९२५

हिंगोली २२१० १४९५

गडचिरोली २२०३ २१०८

रत्नागिरी २४२५ ३०३८

रायगड ३००७ ५५६५