सोलापूर, मुंबई : येत्या आठवडाभर राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात असतानाच राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. राज्यात सोमवारी सोलापुरात सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
७ एप्रिल रोजी सोलापुरात ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढलेला आहे. मुंबईतही तापमान वाढले असून सांताक्रूझ येथे रविवारच्या तुलनेत सोमवारी कमाल तापमान २ अंशांनी वाढून ३६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
विदर्भ- मराठवाड्यात पावसाचा अंदाज
राज्यात अनेक भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील चार दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा तापही वाढत आहे.
पावसाचा अंदाज कुठे?
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा , यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.
या आठवड्यात पुढील जिल्ह्यातील तापमानात वाढ होणार
या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांत तापमानात वाढ होईल. कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान उष्ण व कोरडे राहील. पश्चिम व मध्य विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग २० ते २५ किमीपर्यंत राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. उष्ण लहरी, उष्णतेच्या लाटा जाणवतील.
तापमान नोंदी
आकडेवारी अंश सेल्सिअसमध्ये
सोलापूर – ४२.२
परभणी – ४१.६
जळगाव – ४१.५
मालेगाव – ४०.८
छत्रपती संभाजीनगर- ४०.८
सांगली – ३९.८
कोल्हापूर – ३९.६
नाशिक – ३८.१
सोलापूरमध्ये सर्वाधिक ४२.२ अंश तापमानाची नोंद