मुंबई : राज्यातून फळ निर्यातीला चालना मिळावी म्हणून जळगावात केळी, चंदगडमध्ये काजू आणि विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा येथे संत्रा क्लस्टर स्थापन करण्याची मागणी अपेडाकडे करण्यात आली होती. त्यातील केळी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे, तर काजू आणि संत्रा क्लस्टरच्या लवकरच मान्यता मिळणार आहे.
महाराष्ट्र फळांच्या उत्पादनात देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातून केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा आणि द्राक्ष निर्यात होते. या फळांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात प्राधिकरणाने (अपेडा) पुढाकार घेतला आहे. राज्यातून फळ निर्यातीला चालना देण्यासाठी जळगावात केळी क्लस्टरला परवानगी देण्यात आली आहे. तर विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा येथे संत्रा आणि चंदगड (कोल्हापूर) येथे काजू क्लस्टर स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी जळगावातील केळी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे, तर संत्रा आणि काजू क्लस्टरची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या तीनही क्लस्टरचे काम द्रुतगतीने पूर्ण करण्याचे आदेश अपेडाने दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांना पत्र पाठवून विदर्भातील फळांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी नागपुरात अपेडाचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नागपुरात अपेडाचे विभागीय कार्यालय सुरू करण्याच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे विदर्भातून फळ निर्यातीला चालना मिळणार आहे.
राज्यातील फळे जगाच्या बाजारपेठेत जाणार
अपेडाने जळगावातील केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. विदर्भातील संत्रा आणि चंदगडमधील काजू क्लस्टर मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र फळांच्या उत्पादनात आघाडीवर आहे, चांगल्या निर्यात सुविधा उपलब्ध झाल्यास राज्यात उत्पादीत होणारी फळे जगाच्या बाजारपेठेत पोहचतील, अशी माहिती अपेडाच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. परशराम पाटील यांनी दिली.