मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : महाराष्ट्रातील दळणवळण सुविधा अधिक सक्षम करून जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यात ५ हजार २६७ किमीचे द्रुतगती मार्गाचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुमारे ४ हजार २१७ किमीच्या द्रुतगती मार्गाची कामे केली जाणार आहेत, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय)च्या माध्यमातून सुमारे १ हजार ५० किमीचे द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहेत.
एमएसआरडीसीच्या प्रकल्प प्रस्तावानुसार ४ हजार २१७ किमीपैकी ९४ किमीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग याआधीच पूर्ण झाला असून ७०१ किमीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे जात आहे. यातील पहिला टप्पा येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. या समृद्धी महामार्गाचा विस्तार १८० किमीच्या जालना-नांदेड तसेच १४१ किमीच्या नागपूर-गोंदिया महामार्गाद्वारे केला जाणार आहे. त्याच वेळी गोंदिया-गडचिरोली असा १०६ किमीचा आणि गडचिरोली-नागपूर १५६ किमीचा महामार्ग समृद्धी विस्तारीकरणाचा भाग असणार आहे. त्याशिवाय ३१८ किमीच्या कोकण द्रुतगती मार्गाद्वारे मुंबई आणि सिंधुदुर्ग जोडले जाणार आहे, तर मुंबई महानगर प्रदेशात विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग विकसित करण्यात येणार असून तो ९८ किमीचा असणार आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १६८ किमीच्या महामार्गाची बांधणी करण्यात येणार आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग या ७६० किमीच्या आणि पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग १८० किमीच्या प्रकल्पांचाही यात समावेश असून या दोन्हीचा आराखडा तयार करण्याकरिता नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मराठवाडय़ाचा विकास साधण्यासाठी शिरूर-बीड-लातूर राज्य सीमा महामार्ग असा ३०० किमीचा महामार्ग प्रस्तावित आहे, तर ६५० किमीच्या प्रस्तावित महामार्गाद्वारे नाशिक-धुळे-जळगाव-अमरावती-नागपूरला जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात १२५ किमीच्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचा आणि २४० किमीच्या शेगाव-अकोला-नांदेड महामार्गाचाही समावेश आहे.
एमएसआरडीसीने आता या महामार्गाच्या उभारणीसाठी कंबर कसली आहे. कर्ज उभारणी आणि सरकारी निधी यांतून ही दोन्ही आव्हाने पेलत महामार्ग पूर्ण केला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. ५ हजार २६७ किमीपैकी १ हजार ५० किमीचे काम महामार्ग प्राधिकरण करणार असून विविध राज्यांतून जाणारे महामार्ग महाराष्ट्राला जोडले जाणार आहे. त्यात औरंगाबाद-पुणे महामार्ग (२७० किमी, राज्यातील भाग), सुरत ते चेन्नई महामार्ग (४५० किमी, राज्यातील भाग), दिल्ली-मुंबई महामार्ग (११० किमी, राज्यातील भाग), पुणे-बंगळूरु महामार्ग (२२० किमी, राज्यातील भाग) या महामार्गाचा समावेश आहे.
नियोजित महामार्ग (कंसात अंतर किमी)
* मुंबई-पुणे द्रुतगती (९४ पूर्ण)
* मुंबई-नागपूर समृद्धी (७०१ पूर्णत्वाकडे)
* जालना-नांदेड (१८०)
* नागपूर-गोंदिया (१४१)
* गोंदिया-गडचिरोली (१०६)
* गडचिरोली-नागपूर (१५६)
* कोकण द्रुतगती (३१८)
* पुणे रिंग रोड (१६८)
* विरार-अलिबाग बहुउद्देशीय (९८)
* नागपूर-गोवा शक्तिपीठ – (७६०)
* पुणे-नाशिक औद्योगिक (१८०)
* शिरूर-बीड-लातूर राज्य सीमा ( ३००)
* नाशिक-धुळे-जळगाव-अमरावती-नागपूर (६५०)
* औरंगाबाद-जळगाव (१२५)
* शेगाव-अकोला-नांदेड (२४०)