महाराष्ट्रातील पर्यटकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झाली नसली, तरी राज्यातील सुमारे १२०० पर्यटक भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकले असावेत असा अंदाज असून त्यापैकी ८०० जणांशी नियंत्रण कक्षामार्फत संपर्क झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हवाई दलाच्या विशेष विमानाने त्यांना नवी दिल्लीत आणले जात असून सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना परत आणण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी राज्य सरकारने मुंबई व दिल्लीत विशेष नियंत्रण व मदत कक्ष स्थापन केला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांचे व इतरांचे शेकडो दूरध्वनी सातत्याने नियंत्रण कक्षात खणखणत असून परिस्थितीचा दर तासाला उच्चस्तरीय आढावा घेतला जात आहे. नेपाळमध्ये पर्यटनासाठी वा अन्य कामांसाठी गेलेल्या आप्तांच्या खुशालीबाबत विचारणा करणाऱ्या दूरध्वनींचा ओघ पाहता, राज्यातील सुमारे १२०० नागरिक नेपाळमध्ये अडकले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, सारे पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. काठमांडू विमानतळावर रविवारी सायंकाळी सुमारे नऊ हजार पर्यटक भारतात येण्यासाठी ताटकळले असून, पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे काही पर्यटकांना बसमार्गे भारतात आणले जात आहे, असे दिल्लीतील नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. हवाई दल, एअर इंडिया तसेच एका खाजगी विमान सेवेद्वारे भारतातील पर्यटकांना मायदेशी आणले जाणार असून सोमवारी सकाळपर्यंत हे पर्यटक दाखल होतील. राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्र सदनमध्ये आणण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
हेल्पलाइन क्रमांक
अतिरिक्त निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनमधील नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्र.०११-२३३८०३२४,२५, मुंबईतील मंत्रालयामधील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.०२२- २२०२७९९०
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा