मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६० साली करण्यात आली. र. गो. सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले.
प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी प्रताप सरनाईक यांनी केले. तसेच या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले.
बसस्थानकावर महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृहे उभारणार
एसटीला डिझेल पुरवठा करण्याऱ्या संस्थांकडून सीएसआर निधीच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी दिल्या. तसेच एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना सीएसआर निधीसंबंधित संस्थेने एसटीसाठी खर्च करावा, अशी अट समाविष्ट करावी, असे सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सूचना केली.
भाडेतत्त्वावरील विद्युत बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करा
करारानुसार एसटी महामंडळाला भाडेतत्वावरील ५,१५० विद्युत बस मिळणे अपेक्षित होते. मात्र संबंधित संस्थेने केवळ २२० बस एसटी महामंडळाला पुरविल्या आहेत. भाडेतत्त्वावर विद्युत बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा न करणाऱ्या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचा करार रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या आहेत.