लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रॅगिंग रोखण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत असले तरी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रकरणे घडत आहे. राज्यातील नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे रॅगिंगच्या तक्रारींमध्ये देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

‘सोसायटी अगेन्स्ट व्हायलन्स इन एज्युकेशन’ (सेव्ह) या रॅगिंगविरोधात काम करणाऱ्या संस्थेने २०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीतील रॅगिंगच्या तक्रारीसंदर्भातील ‘भारतात रॅगिंगची स्थिती २०२२-२४’ हा अहवाल आंतरराष्ट्रीय सत्य हक्क दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये देशातील महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठांमधील रॅगिंगसंदर्भातील तक्रारींचा अभ्यास करण्यात आला.

मागील तीन वर्षांत राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर ३ हजार १६० रॅगिंग संदर्भातील तक्रारी नोंदवण्यात आल्या. यापैकी ३८.६ टक्के तक्रारी वैद्यकीय महाविद्यालयातील असून, त्यापैकी ३५.४ टक्के तक्रारी गंभीर आहेत. रॅगिंगसंदर्भात आलेल्या तक्रारींमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या ५१ तक्रारी आहेत. यातील २३ मृत्यू म्हणजे (४५.१ टक्के) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झाले आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देशातील केवळ १.१ टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावरून अन्य महाविद्यालयांच्या तुलनेत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३० पटीने अधिक रॅगिंग होत आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे रॅगिंगचे केंद्र म्हणून उदयास येत आहेत.

‘भारतात रॅगिंगची स्थिती २०२२-२४’ या अहवालामध्ये वैद्यकीय शिक्षणामध्ये नोंदविण्यात आलेल्या रॅगिंगच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये मागील तीन वर्षांमध्ये तब्बल ६१ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यामुळे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अहवालानुसार देशामध्ये मध्य प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठातून रॅगिंगची सर्वाधिक ७५ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमधील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठातून ६८ तक्रारी नोंदवल्या आहेत.

रॅगिंगमुळे २०२४ मध्ये सर्वाधिक मृत्यू

२०२२ ते २०२४ या तीन वर्षांमध्ये देशामध्ये रॅगिंगमुळे ५१ विद्यार्थ्यांनी प्राण गमावले आहेत. २०२४ मध्ये सर्वाधिक २० जणांचे मृत्यू झाले आहेत. २०२३ मध्ये १७, तर २०२२ मध्ये १४ जणांचे मृत्यू झाले आहेत.

तातडीच्या सुधारणा आवश्यक

अहवालात निनावी तक्रारी स्वीकारणे, वसतिगृहांमध्ये सीसी टीव्ही देखरेख सुनिश्चित करणे आणि समर्पित सुरक्षा कर्मचाऱ्यांसह रॅगिंगविरोधी पथके स्थापन करणे, त्यांचे संपर्क तपशील नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे, अशा तातडीच्या सुधारणा करणे आवश्यक आहे. -अजय गोविंद, राष्ट्रीय सचिव

सर्वाधिक तक्रारी असलेली पाच वैद्यकीय विद्यापीठे

मध्य प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ – ७५ तक्रारी
अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठ, उत्तर प्रदेश – ६८ तक्रारी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ – ६१ तक्रारी
राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ – ५२ तक्रारी
पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ – ३९ तक्रारी