गेल्या आठवड्यात ४ जून रोजी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण ५ गटांमध्ये करण्यात आलं. पहिल्या गटापासून पाचव्या गटापर्यंत निर्बंध कठोर होत जातात. यामध्ये मुंबईचा समावेश सुरुवातील तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी घटल्यास मुंबईचं दुसऱ्या किंवा पहिल्या गटामध्ये देखील वर्गीकरण होण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात शिस्तीचं पालन करून पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आणून देखील मुंबईत तिसऱ्याच टप्प्याचे निर्बंध लागू राहणार आहेत. मुंबई पालिकेकडून यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
निकष काय सांगतात?
राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असल्यास अशी शहरं किंवा जिल्ह्यांचा समावेश अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतो. मात्र, असं जरी असलं, तरी राज्य सरकारने फक्त हे निकष ठरवून दिले असून स्थानिक परिस्थितीनुसार त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यानुसार आता मुंबई महानगर पालिकेने मुंबईसाठी निर्णय घेतला आहे.
अनलॉकला आठवडा पूर्ण! जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर!
कसा होणार दर आठवड्याला आढावा?
अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये दर गुरुवारी सर्व जिल्हे आणि स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिका क्षेत्रांमधील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारी ती आकडेवारी जाहीर करण्यात येईल आणि त्याअनुषंगाने संबंधित जिल्हा किंवा शहरासाठी गट बदलण्याचा वा निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय त्यापुढे येणाऱ्या सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे. यानुसार आज राज्य सरकारकडून जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मुंबई आणि उपनगराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ४.४० टक्के असून ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी २७.१२ टक्के आहे. त्यामुळे सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतो. मात्र पालिकेने यासंदर्भात वेगळा निर्णय घेतला आहे.
राज्यात आज ११ हजार ७६६ नवे करोनाबाधित; रिकव्हरी रेट ९५.४ टक्क्यांवर!
..तरीही मुंबई तिसऱ्या टप्प्यातच का?
मुंबई महानगर पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबई शहराची भौकोलिक रचना, लोकसंख्येच्या घनतेचं प्रमाण, लोकलमधून दाटीवाटीने मुंबई शहरात मोठ्या संख्येनं दररोज येणारे प्रवासी आणि भारतीय हवामान खात्याने मुंबई शहरात येत्या काही दिवसांत दिलला अतिवृष्टीचा इशारा या पार्श्वभूमीवर मुंबईत तिसऱ्या टप्प्याचे सध्या अस्तित्वात असलेले निर्बंधच कायम राहणार आहेत. सरकारी आदेशांप्रमाणए सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.