मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६६ टक्के मतदान झाले असले तरी मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुण्यात ६० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. मुंबईसह मोठ्या शहरांमधील कमी मतदानाचा कल लक्षात घेता उद्या मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे.
राज्यात सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत ६६ टक्के मतदान झाले होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६४.१४ टक्के मतदान झाले होते. त्याआधी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ५९ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली असली तरी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमधील मतदानाची टक्केवारी कमी होती. यामुळेच शहरांमधील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने जाहिराती किंवा घरोघरी जाऊन जनजागृती केली आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षणाचा नवा कायदा वेगळा कसा? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
लोकसभा निवडणुकीत कुलाब्यात ४३.७५ टक्के एवढे कमी मतदान झाले होते. मंत्रालय, विधान भवनाचा समावेश असलेल्या कुलाब्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर स्थानिक स्वयंसेवी संघटनांनी प्रयत्न केले आहेत. लोकसभेत मुंबई शहरात ५१.३६ टक्के, तर उपनगरांत ५४.९६ टक्के मतदान झाले होते. ठाणे जिल्ह्यात ५३.८५ टक्के, पुणे ५५.१९ टक्के, नागपूर ५७.४८ टक्के मतदान झाले होते. यामुळेच शहरी भागात अधिक मतदान व्हावे अशी भूमिका मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मांडली होती
मुंबई, ठाण्यात मतदारांमधील निरुत्साह ही निवडणूक आयोगाच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मुंबईसह मोठ्या शहरांच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मतदानासाठी जनजागृती करण्यात आली होती.