Worli Assembly Constituency Aaditya Thackeray: वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१९ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली होती, तेव्हा मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. तसेच शिवसेना-भाजपाची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ती निवडणूक सोपी राहिली. मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून आता राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिंदे गटाने खासदाराला उमेदवारी द्यावी किंवा एकनाथ शिंदे यांनी स्वतः वरळीत उतरावे. तरीही आदित्य ठाकरेच निवडून येणार, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह यांचाही उल्लेख करून संजय राऊत यांनी टीका केली.
एकनाथ शिंदे जागावाटपासाठी दिल्लीवाऱ्या करत आहेत, यावरही संजय राऊत यांनी टीका केली. पूर्वी मातोश्रीवरून जागावाटप होत होते. दिल्लीचे नेते मातोश्रीवर येत असत. मात्र आता नकली शिवसेनेच्या लोकांना दिल्लीत तीन-तीन दिवस तळ ठोकावा लागतो, ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
हे वाचा >> मविआनं तिकीट नाकारलं, झिशान सिद्दिकी आता अजित पवार गटातून आदित्य ठाकरेंच्या भावाला टक्कर देणार
वरळीत जय शाहांनाच उभे करा
वरळी विधानसभेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, मिलिंद देवरा यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी स्वतः आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहावे किंवा दिल्लीतून उमेदवारा आणावा. एवढीच महत्त्वाची जागा असेल तर थेट जय शाहांनाच उभे करावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
हे ही वाचा >> आदित्य ठाकरेंची एकूण मालमत्ता २३ कोटी, तर दाखल गुन्ह्यांमध्ये ‘त्या’ नोंदीचा समावेश; प्रतिज्ञापत्रात सविस्तर तपशील!
आमच्या याद्या एडिट होतील
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र अजूनही काही जागांवरून वाद असल्यामुळे काही जागांमध्ये आणि उमेदवारांच्या नावांमध्ये एडिट होऊ शकते, अशी शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली. आमची आणखी अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी अजूनही बदल होऊ शकतात, असे संजय राऊत म्हणाले.