मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी पडली आहे. थंडीला पोषक हवामान असल्यामुळे महिनाअखेरपर्यंत राज्यभरात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १२.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयासह उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप (थंड हवेचा झोत) सक्रीय आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून राज्यात येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यभरात थंडी पडली आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : धारावीत मतदानाचा उत्साह; पुनर्विकास प्रकल्पाचीही चर्चा
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त आहे. नाशिकमध्ये १२.४, जळगावात १३.२ आणि मालेगाव १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये १३.२, सांगलीत १५.८, कोल्हापुरात १७.२, साताऱ्यात १४.५ आणि सोलापुरात १७.४ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातही पारा खाली आला आहे. गोंदियात १३.५, नागपुरात १३.६, गडचिरोली आणि चंद्रपूर १४.०, वर्ध्यात १५.०, बुलडाण्यात १५.२, अकोल्यात १५.४ आणि अमरावती १५.३ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातही गारठा वाढला असून, औरंगाबादमध्ये पारा १४.०, उस्मानाबादमध्ये १४.८ आणि परभणीत १३.६ अंश सेल्सिअस तापमान होते. किनारपट्टीवर डहाणूत १९.०, कुलाब्यात २३.०, सांताक्रुजमध्ये २०.२ आणि रत्नागिरीत २२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>> पोलिसांविरुद्धच्या नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी
आठवडाभर थंडीस पूरक वातावरण रविवारपासून (१७ नोव्हेंबर) थंडीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. अजूनही आठवडाभर थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात थंडीला अटकाव करणारे कोणतेही वातावरण नाही. आकाश निरभ्र असल्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३१ तर पहाटेचे किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.