मुंबई : प्रतिकूल स्थितीमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, अनेक भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानातील वाढीमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा अजूनही देण्यात येत होता. आता साधारण १ ते ४ एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल. मुंबईमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. पश्चिमी प्रकोपामुळे ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळीच्या वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. तर काही भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि गोवा या भागात मंगळवारी हलक्या सरी कोसळल्या.
विदर्भात उन्हाचा चटका वाढणार

राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा, तसेच विदर्भात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथील तापमान ४०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

पूर्वमोसमी पावसाची शक्यता कुठे ?

कोकणात १ ते ४ एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदी भागातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यांतही चार-पाच दिवस पावसाळी स्थिती असणार आहे.

पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस यांत फरक काय ?

• पूर्वमोसमी पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसात ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू होतो, काही वेळ संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.

• पूर्वमोसमी पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मोसमी पावसात ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.

• पूर्वमोसमी पाऊस गडगडाटी, आणि रौद्र स्वरुपाचा असतो. मोसमी पाऊस संततधार, संथ आणि शांतपणे येतो.