मुंबई : मध्य आशियातून हिमालयात येत असलेल्या पश्चिमी विक्षोपामुळे (थंड वाऱ्यामुळे) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. गुरुवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये राज्यात सर्वात कमी १३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही किमान तापमानात घट झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयात पश्चिम विक्षोप म्हणजे थंड हवेचे झोत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या काही भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतात दाट धुके पडल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे थेट उत्तर महाराष्ट्रात येत असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. नाशिकमध्ये १३.२, नगरमध्ये १४.७, मालेगावात १५.७ आणि जळगावत १५.० अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

हेही वाचा : मराठी मनोरंजनसृष्टीसह कला क्षेत्रावर आश्वासनांचा पाऊस, नवीन चित्रनगरी, अनुदान वाढीसह सुसज्ज सोयी-सुविधांचे जाहीरनाम्यात आश्वासन

मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये १५.६, विदर्भातील नागपूरमध्ये १५.०, यवतमाळमध्ये १५.५, गडचिरोलीमध्ये १५.४, आणि भंडाऱ्यात १५.१ अंश सेल्सिअस तापमान होते. मध्य महाराष्ट्रात पुण्यात १५.२, साताऱ्यात १७.० अंश सेल्सिअस. किनारपट्टीवर आलिबागमध्ये १८.७, सांताक्रुजमध्ये १९.० आणि कुलाब्यात २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय

दरम्यान, पुढील दोन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण होऊन किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पारा कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.