मुंबई : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्याचा अति उच्च काळ संपला आहे. प्रशांत महासागरात ला – निना सक्रीय होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात हिमालय आणि हिमालयाच्या रांगामध्ये अपेक्षित बर्फवृष्टी झाली आहे. थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे.
साधारपणे १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अति उच्च काळ असतो. डिसेंबरमध्ये चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे उपसागरातून देशाच्या भूमीवर बाष्पयुक्त वारे येऊन थंडी कमी होण्याची फारशी शक्यता नाही. दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित प्रमाणात पश्चिमी विक्षोप (थंड हवेचे झोत) हिमालय आणि हिमालयाच्या रांगामध्ये सक्रीय राहिले. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये हिमालयीन रांगात चांगली बर्फवृष्टी झाली आहे. तसेच प्रशांत महासागरात ला – निना सक्रीय होण्याची शक्यता आहे. ला – निना सक्रीय असेल तर जानेवारी महिन्यात हिमालयीन भागात पश्चिम विक्षोप जास्त प्रमाणात येऊन उत्तर भारतात थंडीच्या लाटा जास्त येतात. त्याखालोखाल डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाटा येतात. एकूण स्थिती डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत देशात चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात थंडी का?
हिमालयीन भागात म्हणजे जम्मू काश्मीर, लेह – लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच सिक्कीम या भागात समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचीवरून सातत्याने पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचे झोत) येत आहेत. या वाऱ्याचा वेग ताशी २७५ किलोमीटर इतका आहे. रशिया, मध्य आशियातून गतीने येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे राज्यात चांगली थंडी पडली आहे. एक डिसेंबरपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याची आणि थंडीत किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.
नगरमध्ये पारा ९.२ अंशांवर
राज्यात थंडी कायम असून, मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नगरमध्ये राज्यात सर्वांत कमी ९.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात राज्यात पारा एका अंकावर घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या खालोखाल पुण्यात १०.८, जळगावात ११.०, सातारा १२.९, औरंगाबादेत १२.१, परभणीत १२.०, नागपुरात १२.० आणि गोंदियात १२.२, सातांक्रुजमध्ये १६.८ आणि अलिबागमध्ये १६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
हेही वाचा : मुंबई : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी १० डिसेंबर रोजी परीक्षा
फेब्रुवारीअखेरपर्यंत चांगली थंडी
ला – निना सक्रीय असेल, त्या वर्षी थंडीच्या लाटा जास्त येतात. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीत हिमालयीन भागांत चांगली बर्फवृष्टी होऊन उत्तर भारतासह महाराष्ट्रापर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने राज्यात यंदा फेब्रुवारीअखेरपर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.