मुंबई : हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही. तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती डिसेंबरअखेर सक्रिय होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी (१ नोव्हेंबर) नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर केला. महापात्रा म्हणाले, नोव्हेंबर महिन्यात देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तर भारतात कमाल – किमान तापमान सरासरी दोन ते पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे. ऑक्टोबर महिन्यात पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) न आल्यामुळे हिमालयाच्या पायथ्यासह उत्तर भारतातही थंडी नाही. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पश्चिमी विक्षोपाचा अंदाज नाही. त्यामुळे उत्तरेत आणि पर्यायाने मध्य महाराष्ट्रात अपेक्षित थंडी पडणार नाही. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची वाटचाल पूर्व आंध्र प्रदेशच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण भारतासह मध्य प्रदेशपर्यंत ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशपासून खाली संपूर्ण दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ११८.६९ मिलीमीटर पाऊस पडतो, सरासरीच्या तुलनेत १२३ टक्के पावसाचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढ होईल. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये संपूर्ण भारतात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.

हेही वाचा :महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

ऑक्टोबरही सरासरीपेक्षा उष्ण

देशातील कमाल – किमान तापमानाचा ऑक्टोबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये देशात कमाल तापमान सरासरी ३१.७७ अंश सेल्सिअस असते, ते ३१.९९ अंश सेल्सिअस होते. किमान तापमान सरासरी २०.०१ अंश सेल्सिअस असते, ते २१.८५ अंश सेल्सिअस होते. देशाच्या सर्व उपविभागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले. हवामान विभागाकडील १९०१ पासूनच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमधील आजवरच्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा :पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?

लानिना सक्रिय झाल्यास थंडी

डिसेंबरमध्ये ला-निनो सक्रिय झाला तर जानेवारीनंतर देशात थंडीचे प्रमाण वाढू शकते. या काळात पश्चिमी विक्षोप देशाच्या दिशेने येत राहिल्यास अपेक्षित थंडी पडेल. प्रामुख्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात चांगली थंडी पडू शकेल. चांगल्या थंडीसाठी ला-निनासह पश्चिमी विक्षोपांची गरज असते, असेही महापात्रा म्हणाले.

ला – निनाबाबत जगभरातील सर्वच हवामान संस्थांचे अंदाज चुकले आहेत. आयएमडीच्या दृष्टीने जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोनच महिने थंडीचे आहेत.

डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, भारतीय हवामान विभाग
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra winter updates rain chances in central and south india css