मराठी खाद्य साखळीला परप्रांतीय बल्लवांचे बळ!
महाराष्ट्रीय स्वयंपाकी मिळत नसल्याने उत्तर भारतीय आचाऱ्यांवर मदार
दाक्षिणात्य, पंजाबी, गुजराती, चायनीज अशा खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या उपाहारगृहांच्या शाखा शहरभर पसरत असताना मराठी किंवा महाराष्ट्रीय पदार्थाचा आस्वाद देणाऱ्या व्यावसायिकांनीही आता जागोजागी आपली साखळी उपाहारगृहे किंवा खाद्यविक्री केंद्रे उभारण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या या विस्तारासाठी आवश्यक असलेले महाराष्ट्रीय स्वयंपाकी मिळत नसल्याने यापैकी अनेकांनी परप्रांतीय, त्यातही उत्तर भारतीय आचाऱ्यांना प्रशिक्षित करून महाराष्ट्रीय पदार्थाच्या व्यवसायाचा पसारा वाढवण्यास सुरुवात केली आहे.
चितळे, कामत यांच्या पंक्तीत जाऊन आस्वाद, पोटोबा, मामलेदार मिसळ, आराम वडापाव, पुरेपूर कोल्हापूर, पणशीकर, चैतन्य, गोविंदाश्रम, प्रशांत कॉर्नर यांसारखे मराठी खाद्य व्यावसायिक मुंबईभर आपली साखळी पसरवीत आहेत. परंतु, यापैकी अनेक उपाहारगृहांना मराठी स्वयंपाकी मिळत नाहीत. त्यामुळे, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देऊन परप्रांतीय आचाऱ्यांना नेमावे लागते आहेत. उपाहारगृहातच राहायचे, तिथेच खायचे आणि झोपायचे, यामुळे उपाहारगृहांनाही अशा कर्मचाऱ्यांना नेमणे सोयीचे जाते.
मुंबईकरांना मालवणी खाद्यपदार्थाची सवय लावणाऱ्या ‘चैतन्य’ने जागेची अडचण आणि खवय्यांच्या सोयीसाठी सात महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये शाखा सुरू केली. ‘उद्योग वाढत असला तरी उपाहारगृहात स्वयंपाकींची कमतरता भासते. त्यामुळे ‘चैतन्य’ जरी मराठी पदार्थाचे असले तरी येथील स्वयंपाकी बिहारी आहेत,’ असे या उपाहारगृहाच्या सुरेखा वाळके सांगतात. परंतु, ‘ही माणसे मेहनत घेण्यासाठी तयार असून खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर ते उत्कृष्ट महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ बनवितात,’ हे निरीक्षणदेखील त्यांनी नोंदविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा