मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेला (उद्धव ठाकरे) फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) या मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार दिल्यामुळे पक्षातील मराठी कार्यकर्ते आणि समर्थर नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. या निर्णयामुळे मराठी मते दुरावणार असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनीही अपक्ष अर्ज भरल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत. त्याचा फायदा भाजपला मिळणार की मनसेला याबाबत उत्कंठा वाढली आहे.
पश्चिम उपनगरातील वर्सोवा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांना याच मतदारसंघातून सुमारे २१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वाट्याला आला असून या मतदारसंघात पक्षाने उपविभागप्रमुख हारून खान यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी नगरसेविका राजुल पटेल, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक देवेंद्र (बाळा) आंबेरकर, माजी नगरसेवक यशोधर फणसे यांची नावे चर्चेत होती. मात्र ठाकरे यांनी खान यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांसह शिवसैनिकही नाराज असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>> ५० लाख नवे मतदार, चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या अधिक
वर्सोवा मतदारसंघात भाजपने भारती लव्हेकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांचे नाव जाहीर करण्यास भाजपने दिरंगाई केली होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वात आधी आपला उमेदवार जाहीर केला होता. गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेले संदेश देसाई यांनाच पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
हेही वाचा >>> अमित ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग!
भाजपचा मार्ग सुकर गेल्या वेळी या मतदारसंघातून शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांनी निवडणूक लढविली होती. तर राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळीही ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेची (उद्धव ठाकरे) मराठी मते ते मिळवणार का याबाबतही उत्सुकता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अल्पसंख्याक उमेदवार दिल्यामुळे या मतदारसंघात धार्मिक धृवीकरण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपचा मार्ग सुकर झाल्याचीही चर्चा आहे.