लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाने (महारेरा) घर खरेदीदारांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वसुली आदेशापोटी मुंबई व पुण्यातील पाच विकासकांकडून नऊ कोटींची वसुली केली आहे. लिलावाचे हत्यार न वापरता सततच्या पाठपुराव्यामुळे ही वसुली झाल्याचे महारेराने स्पष्ट केले आहे.
नुकसानभरपाई पोटी वसुली आदेशाची अमलबजावणी व्हावी, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे. महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती जप्त करून लिलावांच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. आपली मिळकत जप्त होऊ नये यासाठी आणखी काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसानभरपाईची रक्कम देत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत. यामुळे नऊ वसुली आदेशापोटी मुंबई शहरव उपनगर आणि पुणे या भागांतील पाच विकासकांनी आठ कोटी ७२ लाख ७१ हजार रुपयांची नुकसानभरपाई अदा केलेली आहे. यापूर्वी ११ विकासकांनी २० वसुली आदेशापोटी आठ कोटी ५७ लाख रुपयांची देणीही अशीच कुठल्याही लिलावाशिवाय अदा केलेली आहे.
हेही वाचा… तुफान पावसात नालासोपारा स्टेशनचा Video पाहून व्हाल थक्क; ट्रेन धावत आली तेवढ्यात…नेमकं घडलं काय?
महारेराने आतापर्यंत ६२३ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी एक हजार १५ वॉरंट्स जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत १८० वसुली आदेशापोटी १३१ कोटींची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई शहरातील समृद्धी डेव्हलपर्स आणि वंडरव्हॅल्यू रिअल्टी प्रा. लि. या विकासकांचा समावेश आहे. यापैकी वंडरव्हॅल्यू रिअल्टी या विकासकाने एका ग्राहकाला तब्बल सहा कोटी २६ लाख रुपयांची भरपाई दिली आहे.
हेही वाचा… मुंबईः वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकी, ऊर्दू भाषेतील संदेशामुळे यंत्रणा सतर्क
मुंबई उपनगरातही रिलायन्स एंटरप्रायझेस आणि रुची प्रिया डेव्हलपर्स प्रा. लि. या विकासकांनी एक कोटी ८४ लाख ४६ हजार रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे. यात रिलायन्सने एका ग्राहकाला नुकसान भरपाईपोटी दिलेली रक्कम एक कोटी ७८ लाख आहे. पुण्यातील दरोडे जोग होम्स प्रा.लि. यांनीही त्यांच्या एका ग्राहकाला ४२ लाख २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई अदा केली आहे.