मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पातील बांधकामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी आता महारेराने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक विकासकाला आता बांधकामाच्या गुणवत्तेबाबतच्या हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. यासंबंधीचा मसुदा महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. यावर सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. विकासक, नागरिकांना यावर २३ मेपर्यंत सूचना, हरकती नोंदविता येणार आहेत.
विकासकांकडून घर, इमारतीच्या एकूणच प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत अनेक दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात ग्राहक घरात रहावयास गेल्यानंतर हे दावे खोटे ठरतात. घरात अनेक त्रुटी आढळतात. प्रकल्पात गुणवत्ता राखली गेली नसल्याचे निदर्शनास येते. एकूणच विकासकांकडून ग्राहकांची फसवणूक होते. दरम्यान, दोष दयित्व कालावधीच्या तरतुदीनुसार, घरात राहिलेल्या त्रुटी हस्तांतरणापासून ५ वर्षांपर्यंत विकासकाला स्वखर्चाने ३० दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात.
हेही वाचा…नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
पण मुळात ताबा घेतल्यानंतर अशी दुरुस्ती करण्याची वेळच येऊ नये, प्रकल्पाची गुणवत्ता राखली जावी यासाठी आता महारेराने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक विकासकाला प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबतचे हमी स्वयंप्रमाणित घोषणापत्र महारेराला सादर करावे लागणार आहे. यात प्रकल्पाच्या उभारणीत वापरली जाणारी सिमेंट, काँक्रिट, स्टील, इलेक्ट्रीकल वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण फिटींग्ज ही सामग्री बिएस/आयएस/ एनबीस प्रमाणित आहेत ना, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची चाचणी, बांधकामयोग्य पाणी वापरले गेले ना या सर्व चांचण्यांच्या नोंदवह्या प्रकल्पस्थळी असणे आदी बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराच्या या निर्णयामुळे आता प्रकल्पात गुणवत्ता राखली जाण्याची हमी मिळणार आहे. या निर्णयासंबंधीचा मसुदा महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत सूचना, हरकती २३ मेपर्यंत suggestions.maharera@gmail.com या ई-मेलवर सादर कराव्या, असे आवाहन महारेराने केले आहे.