मुंबई: महारारे गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेराने विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे येथे विशेष खुले सत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिले सत्र २२ जानेवारीला नागपूरात होणार आहे. महारेरा मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी विकासकांच्या शंकाचे निरसन करणार आहेत.
रेरा कायद्यानुसार राज्यतील प्रत्येक गृहप्रकल्पास नोंदणी बंधनकारक आहे. ही नोंदणी जलद आणि सुलभ व्हावी यासाठी महारेराने विकासकांच्या संघटनांची स्वयंविनियामक संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. या स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून प्रकल्प नोंदणीसाठी विकासकांना मदत केली जाते, असे असले तरी विकासकांना पुरेशी माहिती नसल्याने नोंदणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत विकासकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महारेराने नागपूर आणि पुण्यात प्रत्येक महिन्याला एक विशेष खुले सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहप्रकल्प नोंदणी सुलभ आणि जलद व्हावी यासाठी विशेष खुले सत्र घेण्याची मागणी विकासकांकडून होत होती. ही मागणी मान्य करत विशेष खुल्या सत्राबाबतचा निर्णय महारेराने घेतला आहे. या निर्णयानुसार पहिले सत्र २२ जानेवारीला नागपूरमध्ये होणार आहे. या सत्रात महारेराच्या मुख्यालयातील न्यायिक, आर्थिक आणि तांत्रिक विभागातील अधिकारी उपस्थित राहतील आणि ते विकासकांना आवश्यक ते मार्गदर्शन करतील.