मुंबई : महारेराने नोंदणीकृत दलाल आणि दलाल म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांना महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. असे असतानाही हजारो जुन्या दलालांनी नोंदणीचे नूतनीकरणच केले नसल्याचे पर्यायाने प्रशिक्षण प्रमाणपत्र न घेतल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. अशा १३ हजार ७८५ दलालांची नोंदणी महारेराने रद्द केली आहे. या सर्व दलालांची संकलित यादी महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या दलालांना भविष्यात जागेच्या खरेदी – विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर त्यांना विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : कोस्टल रोडचं उद्घाटन झालं खरं, पण दिवसाच्या फक्त ‘या’ वेळेत करता येणार प्रवास; वाचा सविस्तर माहिती!
स्थावर संपदा क्षेत्रात दलाल म्हणून काम करणाऱ्या जुन्या आणि नव्या दलालांना महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय त्यांना आता काम करता येणार नाही. त्यामुळे २०१७ मधील जुन्या नोंदणीकृत दलालांना प्रशिक्षण परीक्षा देऊन प्रमाणपत्र घेणे आणि त्यानंतर नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. यासाठी मुदतवाढ दिलेली असताना हजारो दलालांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा १३ हजार ७८५ दलालांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द झालेल्या दलालांना आता प्रशिक्षण प्रमाणपत्र घेऊन पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. विनानोंदणी काम करणाऱ्या दलालांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नोंदणी रद्द केलेल्या दलालाची जिल्हानिहाय संख्या
मुंबई उपनगर – ४३५३
ठाणे – ३०७५
पुणे – २३४९
मुंबई शहर – १९३७
रायगड – ७७०
पालघर – ४३३
नागपूर – ३७४
नाशिक – १९५
अमरावती – ४३
छ.संभाजीनगर – ३८
कोल्हापूर – ३०
अहमदनगर – २१
रत्नागिरी – २०
जळगाव ,सातारा – प्रत्येकी १८
चंद्रपूर, सोलापूर – प्रत्येकी १५
धुळे – १२
सांगली – ११
भंडारा – ९
अकोला, सिंधुदुर्ग, वर्धा – प्रत्येकी ७
जालना – ६
गोंदिया – ४
लातूर – ३
बुलढाणा, दादरा नगर हवेली, नांदेड, यवतमाळ – प्रत्येकी २
हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, वाशीम – प्रत्येकी १
एकूण १३,७८५