मुंबई : प्रशिक्षित आणि महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच स्थावर मालमत्ता क्षेत्रात घर खरेदी – विक्री व्यवहार करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आता महारेराने या निर्देशाचे पालन न करणाऱ्या प्रवर्तक आणि प्रकल्पाविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे आदेश महारेराने जारी केले आहेत. या आदेशानुसार प्रकल्प, विकासकांची महारेरा नोंदणी रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
घर खरेदी-विक्री ही दलालांच्या माध्यमातून करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र या दलालांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात दलालांसाठी कोणतेही शिक्षण-प्रशिक्षण आवश्यक नसते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. पण महारेरा कायदा लागू झाल्यानंतर दलालांनाही महारेरा नोंदणी बंधनकारक करण्यात आली. गेल्या वर्षी महारेराने दलालांसाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले. यासाठी प्रशिक्षण आणि परीक्षा घेण्यास सुरुवातही केली. महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांच्या माध्यमातूनच प्रकल्पातील घरांची खरेदी – विक्री व्यवहार करणे १ जानेवारीपासून बंधनकारक केले आहे. महत्त्वाचे म्हणजे विकासकांनी प्रशिक्षित, प्रमाणपत्रधारक दलालांची नावे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा…हार्बर मार्ग विस्कळीत एका मागे एक लोकल उभ्या
या नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू होऊन बरेच महिने झाले. मात्र अनेक विकासकांनी प्रमाणपत्रधारक दलालांची नावे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली नाहीत. प्रमाणपत्र आणि नोंदणी नसलेल्या दलालांकडून खरेदी – विक्रीचे व्यवहार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत अखेर आता या नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवर्तक आणि प्रकल्पांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे लेखी आदेश महारेराने जारी केले आहेत. या आदेशानुसार प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक दलालाऐवजी अन्य व्यक्तीमार्फत मालमत्तेसंबंधी व्यवहार केले जात असल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.