लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : महारेराच्या स्थापनेच्या वेळी कार्यान्वित करण्यात आलेल्या संकेतस्थळात काळानुरूप बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन संकेतस्थळ तयार करण्याचे काम वेगात सुरू असून हे संकेतस्थळ फेब्रुवारीच्या अखेरीस कार्यान्वित करण्याचे महारेराचे नियोजन आहे. नवीन संकेतस्थळ ‘महारेराक्रिटी’ म्हणजे ‘तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी’ या नावाने ओळ्खले जाणार आहे.
पाच वर्षांपूर्वी मे २०१७ मध्ये स्थापनेच्या वेळी महारेराने आपले संकेतस्थळ तयार करून कार्यान्वित केले होते. मात्र आता या संकेतस्थळात काळानुरूप अमूलाग्र बदल करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन महारेराने नवीन संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवीन संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे संकेतस्थळ कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सध्याचे संकेतस्थळ काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात येणार आहे. हे संकेतस्थळ वापरकर्तास्नेही असणार आहे. तर ग्राहकांना उपयुक्त ठरतील असे अनेक घटक यात समाविष्ट करण्यात येत आहेत. लवकरच कार्यान्वित होणाऱ्या संकेतस्थळावर ग्राहकांना तक्रार नोंदवणे अधिक सोपे व्हावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
आणखी वाचा-आज मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक ब्लॉक
शिवाय प्रकल्पांची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना ही माहिती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे घर खरेदीदारांना गुंतवणूक केलेल्या किंवा करायची असल्यास त्या प्रकल्पाची सद्यस्थिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. यात विकासकांसाठीही अनेक घटक आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे विकासकांना सध्या प्रपत्र १, २ आणि ३ तिमाही आणि प्रपत्र ५ वर्षाला सादर करावे लागते. हा अनेक पानांचा दस्तावेज असतो. हे संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर ही माहिती सहजपणे भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. या नवीन संकेतस्थळामुळे एकूण स्थावर संपदा क्षेत्रात पारदर्शक आणि कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत व्हावी असा महारेराचा प्रयत्न आहे.