महापुरुषांच्या नावाने त्यांचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन ओळखला जातो. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदाच्या नावानेही एखादा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचे ज्यांनी नेतृत्व केले त्या महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. तोच दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जात असताना केंद्र व राज्य सरकारने त्यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकातून गांधीजी मात्र गायब झालेले आहेत. विशेष म्हणजे गांधीजींच्या नावाने प्रदीर्घ काळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसच्या राजवटीपासूनच गांधीजींचे नाव लपवून हुतात्मा दिन पाळण्याचा प्रकार सुरू आहे.
राज्य सरकारने स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली, म्हणून तो हुतात्मा दिवस म्हणून देशभर पाळला जातो. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख राजघाटावर गांधीजींच्या समाधीजवळ महात्म्याला श्रद्धांजली अर्पण करतात. मात्र केंद्रीय गृह मंत्रालय व राज्य सरकारकडून वर्षांनुवर्षे ३० जानेवारीला हुतात्मा दिन पाळण्यासाठी जारी करण्यात येणाऱ्या परिपत्रकात गांधीजींचे नाव नसते. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी ६ जानेवारीला सर्व राज्यांना पाठविलेल्या पत्रात ३० जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून पाळावा, असे म्हटले आहे, परंतु त्यात कुठेही गांधीजींचा उल्लेख नाही. शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करावेत, त्यात स्वातंत्र्य चळवळीबद्दलची माहिती द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र गांधीजींबद्दल अवाक्षरही नाही.
केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाच्या संकेत स्थळावर मात्र हुतात्मा दिन पाळण्यामागचे गांधीहत्येचे निमित्त नोंदले असून गांधीजींच्या हत्येचे साक्षीदार, स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ पत्रकार शैलेन चटर्जी यांचा लेखही प्रसिद्ध केला आहे. मात्र या लेखात गाधीजींचा मारेकरी नथूराम गोडसे याचा कुठेही उल्लेख नाही.

सामान्य प्रशासन विभागाचे
अप्पर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी, गांधीजींची हत्या झाली तोच दिवस हुतात्मा दिन, असे सांगितले. मग गांधीजींच्या नावाचा उल्लेख का नाही, असे विचारता, परिपत्रक बघून सांगावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.