महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून सातत्याने अपमान होत आहे. सीमाभागातील गावांकडून महाराष्ट्रबाहेर जाण्याची इतिहासात पहिल्यांदाच होत असलेली मागणी, मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर पळवल्याने नुकसान होत आहे. त्याविरोधात १७ तारखेला मुंबईत जिजामाता उद्याने ते आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार. या मोर्चात सर्व महाराष्ट्र अभिमानी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
“वाढती महागाई, बेरोजगारी, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेलं अपयश, अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, राज्याच्या हितांचे रक्षण या सरकारकडून होऊ शकलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची धमक या सरकारमध्ये नाही,” अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीचा मुंबईत ‘महामोर्चा’; कुठून निघणार मोर्चा, कुठे होणार सभा, कोण होणार सहभागी? वाचा सविस्तर
माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक आज अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांची संवाद साधताना अजित पवार यांनी राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशावर कडाडून हल्ला चढवला.
“राज्याच्या सीमाभागातील गावांनी महाराष्ट्रबाहेर जाण्याची मागणी करावी, असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी महापुरुषांचा अवमान करण्याचं दूस्साहस यापूर्वी कधीही केलं नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यापूर्वी कधीही हतबल दिसला नव्हता. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊनही, माध्यमांमध्ये तसे जाहीर करूनही राज्याचे दोन मंत्री मराठी भाषिक बेळगाव मध्ये जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये बंदी कशी होऊ शकते आणि महाराष्ट्र सरकार हे कसं सहन करतं, हे समजत नाही,” असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला
“महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाआधी राज्यपालांना पदावरून हटवलं तरीही हा मोर्चा निघणारच. नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, गुजरात सीमेलगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील तसेच अन्य गावांसाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक विकासकामे जाहीर करून त्यासाठी निधीही उपलब्ध केला होता. त्या कामांना स्थगिती देण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केलं आहे,” असा आरोपही अजित पवार यांनी शिंदे सरकावर केला.