मुंबई : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. ४८ पैकी शिवेसना ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १८ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार गट) १० जागा, असे जागावटपाचे सूत्र ठरविण्यात आल्याचे समजते. उद्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून, त्यात जागावाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते.शिवसेना व काँग्रेस यांच्यात सांगली लोकसभा मतदारसंघावरून वाद निर्माण झाला आहे. भिवंडी मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे, परंतु हा मतदारसंघावरील आपला हक्क काँग्रेस सोडायला तयार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचित बहुजन आघाडी सातत्याने वेगवेगळया अटी घालत असल्याने तूर्तास महाविमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जागावाटप तसेच, उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेते मंगळवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत अनिश्चितता आहे. वंचितचा समावेश झालाच तर शिवसेना व काँग्रेसच्या कोट्यातून चार जागा देण्याची तयारी केली असल्याचे कळते. राजू शेट्टी व महादेव जानकर महाविमध्ये आले तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून दोन जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

काँग्रेसकडून आग्रह

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया बुधवारपासून सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर या पाच मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या पाचही मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यासाठी जागावाटपाचा अंतिम निर्णय तातडीने होणे काँग्रेससाठी आवश्यक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi meeting regarding seat allocation in lok sabha elections will be decided today mumbai amy