मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव, पहाडी येथील अत्यल्प-अल्प गटातील इमारतींची पाण्याची आणि विजेची देयके थकविली होती. त्यात आता कोकण मंडळानेही शिरढोण प्रकल्पातील १५ इमारतींचे विजेची देयके थकविल्याने महावितरणने गुरुवारी इमारतींचा वीज पुरवठा खंडीत केला होता. रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर मात्र कोकण मंडळाला देयके थकल्याची जाणिव झाली आणि अखेर देयके भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला.

रहिवाशांची गैरसोय

म्हाडाकडून गृहप्रकल्पात वीज, पाणी आणि अन्य काही सेवा पुरविल्या जातात. त्यासाठी म्हाडा रहिवाशांकडून दर महिन्याला निश्चित अशी रक्कम सेवाशुल्क म्हणून वसूल करते. हे सेवाशुल्क वेळेत वसूल केले जाते. पण असे असताना म्हाडाच्या मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाकडून विजेसह पाण्याच्या देयकांचा भरणाच केला जात नसल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई मंडळाने पहाडी गोरेगाव येथील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींच्या विजेची २० लाखांची आणि पाण्याची ३५ लाखांची देयके अदा केली नव्हती. त्यामुळे तेथील रहिवाशांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. रहिवाशांच्या तक्रारीनंतर देयके थकवल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले.

अखेर मुंबई मंडळाने देयकांचा भरणा केला. हा प्रकार ताजा असतानाच म्हाडाच्या कोकण मंडळानेही शिरढोण या पंतप्रधान आवास योजनेतील १५ इमारतींची विजेची देयके न भरल्याने गुरुवारी सकाळी १० वाजता महावितरणकडून या इमारतींचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाण्याचे पंप, सार्वजनिक परिसरातील वीज, उद्वाहक अशा सेवा बंद झाल्या आणि त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. त्याबाबत रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. म्हाडा सेवाशुल्क वेळेत वसूल करते पण देयकांचा भरणा करत नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी महावितरण आणि म्हाडाच्या कोकण मंडळाकडे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला.

रात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत

शिरढोणमधील रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर अखेर कोकण मंडळाला जाग आली. त्यानंतर देयकांचा भरणा करण्याची धावपळ मंडळाने सुरू केली. अखेर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून रात्री उशीरा देयकांचा भरणा करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा वीज पुरवठा पुर्ववत झाला, अशी माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. दरम्यान गोरेगावमधील पाणी आणि वीज देयकांचा भरणा करण्यात आल्याने तेथील रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे.