वीजपुरवठा बंद पडला वा इतर काही समस्या असल्या की नेमका त्याचवेळी वीज कार्यालयाचा दूरध्वनी लागत नाही. कधी तो काढून ठेवलेला असतो हा वारंवार येणारा अनुभव. पण आता हळूहळू हे चित्र बदलण्याचा निर्धार ‘महावितरण’ने केला असून ग्राहक सेवेचा दर्जा सुधारा आणि तक्रार निवारण वेळेत करा अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यभरात अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे.
राज्यात गेली १३-१४ वर्षे वीजटंचाई असल्याने विजेची मागणी व उपलब्धता यांचा मेळ घालण्यावरच आजवर ‘महावितरण’ने लक्ष केंद्रित केले होते. विजेची तूट पाच हजार मेगावॉटपर्यंत पोहोचल्याने शक्य होईल तेथून वीज मिळवणे आणि भारनियमन आटोक्यात राहील वा वेळापत्रकाप्रमाणे राहील यातच ‘महावितरण’ची शक्ती खर्ची पडत होती. गेल्या दोन-तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने विजेची तूट कमी झाली.
वीजपुरवठय़ाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने ‘महावितरण’ने आता ग्राहक सेवा आणि तक्रार निवारणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. सुरळीत वीजपुरवठा आणि वीजपुरवठय़ाशी संबंधित विविध ग्राहक सेवा उत्तम प्रकारे पुरवणे आणि तक्रार निवारण जलदगतीने करणे हे आता महत्त्वाचे आहे. ग्राहकांचे समाधान राखले तरच कंपनीचे भवितव्य चांगले राहील. कंपनी चांगल्या परिस्थतीत राहिली तरच कर्मचाऱ्यांचे भले होईल. हे लक्षात ठेवून आता ग्राहक सेवेचा दर्जा सुधारा आणि तक्रार निवारण कमीत कमी वेळेत करण्याचा प्रयत्न करा, असा आदेश ‘महावितरण’च्या व्यवस्थापनाने राज्यभरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला आहे.  तक्रार निवारण वेळेत झाले नाही तर ती तक्रार वरिष्ठांपर्यंत जाईल. त्यातून कामाचे मूल्यमापन होईल, कोणत्या भागात लोक चांगल्यारितीने काम करत आहेत. कोणत्या भागात सेवेचा दर्जा चांगला नाही याचे अहवाल तयार करण्यात येतील. नंतर हे अहवाल जाहीर करून लोकांपुढे आपली कामगिरी ठेवली जाईल.