मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर जास्त विलंब न लावता दोन दिवसांत मंत्रालयातील दालन व बंगले वाटप करण्यात आले. विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्री वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा बघून दालन व बंगले घेत असतात. पण वाटपाचे थेट आदेश आल्याने मंत्री गडबडून गेले. मंत्रालयात सर्व मंत्र्यांना सामावून घेण्याएवढी दालने उपलब्ध नसल्याने तीन राज्यमंत्र्यांची कार्यालये विधान भवनात थाटण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास विलंब लागला होता. या तुलनेत मंत्र्यांची दालने व बंगल्यांचे वाटप तात्काळ करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश जारी केले. पण हे वाटप होताच काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली तर काही जणांनी बंगले बदलून देण्याची मागणी केली. बहुतांशी जुन्या मंत्र्यांची दालने व बंगले कायम ठेवण्यात आले. मंत्र्यांच्या नाराजीनंतर काही जणांचे बंगले वा दालने बदलून दिले जाण्याची शक्यता आहे.

बंगल्यांचेही वाटप

दालनांबरोबर बंगले वाटपात राधाकृष्ण विखे पाटील यांना पूर्वीचा रॉयलस्टोन, पंकजा मुंडे यांना रामटेक, शंभुराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईक यांना देसाई यांचा मंत्रालयासमोरील पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचा सातपुडा, चंद्रकांत पाटील यांचा सिंहगड बंगला कायम ठेवण्यात आला. अगोदर मंत्रीपदावरून, नंतर खातेवाटपावरून काही नेत्यांमध्ये नाराजी होती. आता बंगले वाटपावरूनही मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> मंत्रालयातील सहावा मजला अभ्यागतांसाठी बंद?

कोणालाकोठे दालन?

● महायुतीच्या ३३ मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. बावनकुळे यांना मंत्रालय विस्तार इमारतीतील पहिल्या मजल्यावर पाच दालनांचे एक दालन जाहीर झाले आहे.

● याच इमारतीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाचव्या मजल्यावरील जुने दालन व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांचे तिसऱ्या मंजल्यावरील दालने कायम ठेवण्यात आली आहेत.

● गिरीष महाजन, मंगलप्रभात लोढा यांची दालने ‘जैसे थे’ आहेत.

● शिवसेना शिंदे पक्षाच्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (सातवा मजला) गुलाबराव पाटील (चौथा मजला) संजय राठोड ( पहिला मजला) उदय सामंत ( पहिला मजला) यांची दालने कायम आहेत.

● या मंत्रिमंडळातील नवीन मंत्री गणेश नाईक (पाचवा मजला), जयकुमार रावल (चौथा मजला), पंकजा मुंडे (चौथा मजला), अशोक उईके (पाचवा मजला), अॅड. आशीष शेलार (चौथा मजला), दत्तात्रय भरणे (तिसरा मजला), शिवेंद्रसिंह भोसले (सहावा मजला), अॅड. माणिकराव कोकाटे (दुसरा मजला), जयकुमार गोरे (मुख्य इमारतीत पोटमाळा), नरहरी झिरवाळ (दुसरा मजला), संजय सावकारे (तिसरा मजला), संजय शिरसाट (सातवा मजला), प्रताप सरनाईक (चौथा मजला), भरत गोगावले (तिसरा मजला), मकरंद पाटील (तिसरा मजला), नितेश राणे (मुख्य इमारतीत दोन क्रमांकाचा पोटमाळा), आकाश फुंडकर (विस्तार इमारतीत पहिला मजला), बाबासाहेब पाटील (पाचवा मजला), प्रकाश आबिटकर (विस्तार इमारतीत दुसरा मजला) यांना दालन वाटप करण्यात आलेली आहेत.

● सहा राज्यमंत्र्यापैकी मेघना बोर्डीकर, इंद्रनिल नाईक, योगेश कदम यांना विधानमंडळात पहिल्या मजल्यावर दालने देण्यात आली आहेत.

बावनकुळे यांचा ‘रामटेक’ बदलला!मंत्रालयीन वर्तुळात नारायणराव दाभोळकर मार्गावरील प्रशस्त आणि समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला अपशकुनी मानला जातो. कारण या बंगल्यात वास्तव केलेल्यांवर एकतर बालंट आले वा त्यांचे मंत्रीपद गेले. ताजे उदाहरण दीपक केसरकर यांचे देता येईल. हा बंगला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी वाटप झाल्याचा आदेश दुपारी निघाला होता. पण नंतर सूत्रे हलली आणि ‘रामटेक’ निवासस्थान पंकजा मुंडे यांना देण्यात आले. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti government allotted bungalows and offices to ministers after after allocation of cabinet portfolios zws