मुंबई/नवी दिल्ली/ठाणे : सरकार स्थापण्यात आपला कोणताही अडसर असणार नाही आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे स्पष्ट करीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शर्यतीतून एक प्रकारे माघारच घेतली. यामुळे आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर गुरुवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री व सत्तावाटपावर निर्णय घेण्यात येणार आहे. या साऱ्या घडामोडींनुसार देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला तरी बुधवारी दुपारपर्यंत नवीन सरकार स्थापण्यासाठी महायुतीत काहीच हालचाली दिसत नव्हत्या. मात्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल, असे जाहीर केल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन तीन दिवसांनंतर मौन सोडले. मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, यासाठी शिंदे यांनी गेले दोन दिवस प्रयत्न केले होते. पण १३२ जागा जिंकल्याने भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, असे संकेत मंगळवारीच दिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा सूर काहीसा नरमला होता. तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही सौम्य झाली होती.
हेही वाचा >>>आफ्रिकेतील मलावी हापूस मुंबईत दाखल, जाणून घ्या, देशातील कोणत्या शहरात मिळणार
शिंदे यांचे सुमारे अर्ध्या तासाचे निवेदन म्हणजे जणू काही निरोपाचे भाषण होते. गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नवी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची बैठक बोलाविल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडताच लगेचच नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. भाजप नेतृत्वाने सूचना केल्यानुसार शिंदे यांनी माघारीचे संकेत द्यायचे, भाजपने या भूमिकेचे स्वागत करायचे हा ठरलेला कार्यक्रम दिवसभरात पार पडला.
मंत्रिमंडळाचे सूत्रही ठरणार
गुरुवारी दिल्लीत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच, या बैठकीमध्ये नव्या मंत्रिमंडळातील मंत्रीपदाचे सूत्रही निश्चित केले जाणार असल्याचे समजते.
हेही वाचा >>>नाशिक, नगर, पुण्यात थंडीच्या लाटेची शक्यता, जाणून घ्या, थंडीच्या लाटेची शक्यता का निर्माण झाली
राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी महायुतीतील एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्लीत येणार आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेमका काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांनी मात्र यापूर्वीच अनुकूलता व्यक्त केली आहे. पक्षनिहाय मंत्रीपदाची संख्या व वाटप या सर्व बाबींवर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महायुतीतील नेत्याने दिली.
भाजप निरीक्षक लवकरच मुंबईत
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीनंतर आगामी दोन दिवसांमध्ये भाजपचे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव मुंबईला जाऊन भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत नेतेपदाची निवड करतील. त्यानंतर १ वा २ डिसेंबर रोजी महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे समजते. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा प्रस्ताव शिंदे मांडतील व त्याला अजित पवार अनुमोदन देतील.
महत्त्व अबाधित राखण्याचा शिंदे यांचा प्रयत्न
मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने नवीन सरकारमध्ये आपले महत्त्व अबाधित राहावे यासाठी एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल. नगरविकास हे खाते स्वत:कडे कायम ठेवताना आणखी एखादे महत्त्वाचे खाते मिळावे, असा शिंदे यांचा प्रयत्न असेल. याशिवाय उद्याोग, रस्ते विकास मंडळ, आरोग्य, शिक्षणसारखी महत्त्वाची खाती शिवसेनेच्या मंत्र्यांकडे कायम राहावीत यासाठी शिंदे आग्रही असतील.
महायुतीत मतभेद नाहीत. जे काही किंतु-परंतु होते ते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दूर केले आहेत. लवकरच महायुतीचा नेता निवडीबाबत तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल व त्यात निर्णय घेतला जाईल. -देवेंद्र फडणवीस, भाजप नेते
वीन सरकार स्थापण्यात आपला कोणताही अडसर असणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री