स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा दबाव असताना महायुतीनेच निवडणूक लढवावी, अशा सूचना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेबरोबर जागावाटपाची बोलणी पुढील आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता आहे.  जागावाटपात किमान १४४ जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भाजपची ताठर भूमिकाही मवाळ होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत आग्रही असून उद्धव ठाकरे यांचे नाव निवडणुकीआधी जाहीर करण्याची अटही भाजपने स्वीकारावी, असाही कल ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.   
अमित शहा यांच्याबरोबर भाजप नेत्यांची चर्चा झाली व त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही सूचना दिल्या. गेली १५ वष्रे राज्यात असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार घालविण्यासाठी प्राधान्य द्यावे. शिवसेनेशी युती तोडण्याची भाषा करण्यापेक्षा जागावाटपात काही तडजोड करून ती टिकविण्यासाठी प्राधान्य असावे, अशी भाजपच्या काही नेत्यांची भूमिका आहे. युती तोडण्यासाठी ही योग्य वेळ नाही. ती तोडायची असेल, तर राज्यभरात वातावरण तयार करावे लागेल व कार्यकर्त्यांना दिशा द्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते करण्याची ताकद असलेले नेतृत्व भाजपमध्ये राज्यात नाही. केंद्रातील कार्यभाग साधल्याने भाजपने जुन्या मित्राची साथ सोडली, असा संदेश जाऊन जनतेमध्ये प्रतिकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युती टिकवावी, अशी मते काही नेत्यांनी शहा यांच्यापुढे मांडली.
केंद्रात भाजप आणि राज्यात शिवसेना मोठा भाऊ ही युतीची भूमिका आहे. लोकसभेच्या वेळी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याचा फायदा झाला. मग राज्यातही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. त्याला विरोध करून भाजपच्या हाती काय लागणार, उपमुख्यमंत्री पदच स्वीकारायचे आहे, तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला काय किंवा नाही, यामुळे भाजपला काय फरक पडतो, अशीही काही नेत्यांची भूमिका आहे.

Story img Loader