महायुतीतील चार सहकारी पक्षांनीच २८८ पैकी १५० हून अधिक जागांची मागणी भाजप-शिवसेनेकडे केली आहे. त्यामुळे या घटकपक्षांसाठी जागा सोडून आपल्या वाटय़ाला किती जागा येतील, असा प्रश्न भाजप-शिवसेनेला पडला असून या पक्षांशी चर्चा करण्यासाठी आणि अन्य समन्वयासाठी पाच समित्या नेमण्यात आल्या आहेत. शिवसेनेबरोबरची युती राहिली, तर मित्रपक्षांसाठी भाजपला अधिक जागा सोडणे अशक्य आहे. मात्र भाजप-शिवसेना युती न टिकल्यास अन्य चार लहान पक्षांच्या मागणीला भाजप न्याय देऊ शकणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
जागावाटपात फारशी प्रगती झाली नसली तरीही महायुतीचे जागावाटप १० ऑगस्टपर्यंत सुरळीत पार पडेल आणि १५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. महायुतीतील सहाही घटक पक्षांची जागावाटपाची बैठक सोमवारी पार पडली.भाजप-शिवसेनेच्या विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघांची मागणीही या मित्रपक्षांनी केली आहे. मित्रपक्षांची मागणी पाहता त्यांना जागा सोडल्यावर शिवसेना-भाजपकडे किती जागा उरणार, असा प्रश्न आहे. त्यातच भाजपलाही शिवसेनेकडून अधिक जागा हव्या असल्याने हा तिढा सोडविणे कठीण होणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील प्रत्येकी एक सदस्य हे एकेका सहकारी पक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागावाटपाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्यादृष्टीने पाच समित्या नेमण्यात आल्या आहेत. ही चर्चा झाल्यावर ४ ऑगस्ट रोजी पुढील बैठक होणार आहे.
जागांची यादीच सादर
रिपब्लिकन पक्षाला ४० हून अधिक जागा हव्या असून त्यापैकी २० जागांसाठी ठाम आग्रह आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ५९ जागांची यादी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांना ४० हून अधिक जागांची अपेक्षा असून शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना किमान १६ जागा हव्या आहेत. त्यांनी आपल्या जागांची यादी शिवसेना-भाजपकडे सादर केली नसून किती जागा देणार, असा सवालच भाजपला केला आहे.
महायुतीतील चार पक्षांचा १५० जागांवर डोळा !
महायुतीतील चार सहकारी पक्षांनीच २८८ पैकी १५० हून अधिक जागांची मागणी भाजप-शिवसेनेकडे केली आहे.

First published on: 29-07-2014 at 03:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti seat sharing 4 parties demands over 150 seats