मुंबई : मतमोजणीसाठी शनिवारी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीनेही सावध पवित्रा घेतला आहे. भाजपने गरज भासल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांना बरोबर घेण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसने अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली तीन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. वंचित बहुजन आघाडीने सत्ताधारी पक्षांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निकालाआधीच जाहीर केले.

निकालानंतरच्या समीकरणांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांशी शुक्रवारी चर्चाही केली. महायुतीला १५० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास बहुसंख्य मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून व्यक्त झाल्याने भाजपचा उत्साह दुणावला आहे. भाजप आणि महायुतीला वाढलेल्या मतदानाचा लाभ होऊन बहुमत मिळेल, अशी आशा वाटत असून पक्षांतर्गत सर्वेक्षण आणि निवडणूक चाचण्यांमधूनही तसे अंदाज व्यक्त झाले आहेत.

महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले आणि अपक्ष किंवा छोट्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला, तर त्या दृष्टीनेही भाजपने तयारी सुरू केली आहे. बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अन्य छोटे पक्ष, काही अपक्ष आणि बंडखोर यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण या फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी या नेत्यांशी संपर्क साधून प्राथमिक चर्चाही केली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीच्या केंद्रावरील ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा आता दोन केंद्रांवर

महायुतीला जर काठावरचे बहुमत मिळाले, तर छोटे पक्ष, अपक्ष आमदार यांना निकाल लागल्यावर लगेच भाजप कार्यकर्त्यांच्या संरक्षणात मुंबईला आणून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षित स्थळी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या आमदारांच्या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षऱ्या घेऊन राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र लवकर सादर करण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी ठेवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपक्ष किंवा छोट्या पक्षांशी संपर्क साधता येऊ नये किंवा या आमदारांना आपल्या बाजूने वळविता येऊ नये, यासाठी भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.

काँग्रेसकडूनही खबरदारी

महाविकास आघाडीला सरकार स्थापण्यासाठी संख्याबळ कमी पडल्यास अपक्ष व छोट्या पक्षांच्या आमदारांना बरोबर घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांनीही रणनीती आखली आहे. तशी वेळ आल्यास विविध पक्षांच्या नेत्यांवर अपक्षांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सत्ता स्थापण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या संख्याबळात फारसे अंतर नसल्यास निवडून येणाऱ्या आमदारांना तात्काळ मुंबईत आणण्यात येणार आहे.

वंचित सत्ताधाऱ्यांबरोबर

वंचित बहुजन आघाडीने सत्ताधारी पक्षांबरोबर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वंचितला कितपत यश मिळेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. पण वंचितचे आमदार हे ज्या पक्षांचे सरकार येईल, त्यांना पाठिंबा देईल, असे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीचे सरकार येईल त्याला वंचितचा पाठिंबा असेल.