मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने चर्चेतून जागावाटपाचा तिढा सोडविला. महायुतीत मुंबई आणि कोकण पदवीधरमधून शिवसेना शिंदे गटाने भाजपसाठी माघार घेतली. नाशिक शिक्षकमध्ये शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार परस्परांच्या विरोधात रिंगणात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदवीधर आणि शिक्षकच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.  मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपचे किरण शेलार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत यांनी अर्ज दाखल केल्याने महायुतीत बिनसले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शिंदे गटाने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार  सावंत यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली.

हेही वाचा >>> माझे पदवी प्रमाणपत्र खरे! उद्धव ठाकरे यांचा मोदींना टोला

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांनी अर्ज भरला होता. भाजपकडील विद्यमान जागा कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने मोरे यांनी माघार घेतली. मनसेने यापूर्वीच माघार घेण्याची घोषणा केली होती. मुंबई शिक्षकमध्ये भाजपचे बंडखोर अनिल बोरनारे यांनी माघार घेतली.

कोकण पदवीधरमध्ये काँग्रेस

महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसने परस्परांच्या विरोधात अर्ज दाखल केले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होत नाही, या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने आघाडीत बिघाडी निर्माण झाली होती. पण काँग्रेसच्या नवी दिल्लीतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर उभय बाजूने माघार घेण्यात आली. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट तीन जागा तर काँग्रेस एका जागेवर लढणार आहे. कोकण पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन यांनी माघार घेतली. काँग्रेसचे रमेश कीर यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात आता भाजपचे निरंजन डावखरे विरुद्द काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होईल.

मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होईल. मुंबई शिक्षकमध्ये शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे यांच्यात लढत होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti vs maha vikas aghadi in mumbai konkan graduate constituency of vidhan parishad poll zws
Show comments