विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांना चुचकारण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने गेल्या एक ते दीड महिन्यात घेतलेल्या सर्व निर्णयांना महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेतली आहे. आघाडी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांचा आम्ही फेरविचार करू आणि अयोग्य निर्णय रद्द करू, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मांडली. फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे या निर्णयांविरोधातील आपली भूमिका मांडली.
केवळ मतदारांना प्रलोभित करण्यासाठीच आघाडी सरकारने गेल्या महिन्याभराच्या काळात तब्बल १०७१ शासन निर्णय जाहीर केले आहेत. या सर्व निर्णयांना आपली हरकत असून, हे सर्व निर्णय स्थगित करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पत्र देऊन त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.
फडणवीस यांनीही यासंदर्भातच राज्यपालांची भेट घेतली. निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार केला जाईल. त्यातील योग्य निर्णय कायम ठेवण्यात येतील आणि अयोग्य निर्णय रद्द करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
…आघाडी सरकारचे ‘ते’ निर्णय आम्ही रद्द करू – महायुती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांना चुचकारण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने गेल्या एक ते दीड महिन्यात घेतलेल्या सर्व निर्णयांना महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेतली आहे.

First published on: 10-09-2014 at 12:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti wants to stay state governments decision