सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या तर महिन्या दोन महिन्यातच पुन्हा पुन्हा बदल्या केल्या जात आहेत. मालाड मधील पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना नुकताच परळ, लालबाग मधील एफ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. आता त्यांच्याकडे कर निर्धारण आणि संकलक या विभागाचाही अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
हेही वाचा – पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर उद्या मेगा ब्लॉक नाही
पालिकेत मोठ्या प्रमाणावर खाते पालट सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना एका विभागात तीन वर्षे झाली म्हणून तर काहींना राजकीय आकसामुळे अन्य विभागात पाठवण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्तांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी महेश पाटील यांना एफ दक्षिण विभागाचा पदभार देण्यात आला होता, तर एफ दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची बदली दक्षिण मुंबईतील ए विभागात करण्यात आली होती. मात्र क्षीरसागर यांनी आपल्या वैयक्तिक कारणासाठी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, महेश पाटील यांना एफ दक्षिण बरोबरच आता करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभारही देण्यात आला आहे.
हेही वाचा – घाटकोपर : दुचाकी उभी करण्यावरून झालेल्या वादातून तरूणाची हत्या
यापूर्वी करनिर्धारण आणि संकलक या विभागाचा पदभार ज्यांच्याकडे होता ते विश्वास मोटे यांच्याकडे आता चेंबूर गोवंडीचा भाग असलेल्या एम पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पूर्ण वेळ कार्यभार देण्यात आला आहे.सततच्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्येही दहशतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. मात्र पालिकेच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होतो आहे.