मुंबई : ‘भारतात सर्वाधिक नोकऱ्या या शासकीय यंत्रणेत आहेत. तुमच्यात देशाचा चेहरामोहरा बदलण्याची तळमळ आणि देशसेवा करण्याची इच्छा असल्यास, शासकीय सेवेत येण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. तेथे तुमच्यावर कोणाचाही दबाव नसतो. एकवेळ प्रशासनात नोकरभरती होणार नाही, परंतु नोकरकपातही होणार नाही. नोकरीची सर्वाधिक हमी ही शासकीय सेवेत आहे’, असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी शुक्रवारी लोकसत्ता मार्ग यशाचा कार्यशाळेत व्यक्त केले.
बदलत्या काळानुसार करिअरच्या नव्या वाटांबाबत सखोल मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचा पहिला दिवस शुक्रवारी, २६ मे रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे पार पडला. शैक्षणिक प्रवासाला कलाटणी देणाऱ्या दहावी- बारावीच्या निकालानंतर भविष्यातील करिअरच्या संधींच्या दृष्टीने कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी आणि नवे शैक्षणिक धोरण कसे असेल हे जाणून घेण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पालकांसह हजेरी लावली. उपस्थितांना विविध अभ्यासक्रम, शिक्षण संस्था, प्रवेश प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलेच, त्याचबरोबर विविध संस्थांच्या माहिती कक्षातूनही (स्टॉल्स) तपशिलात माहिती मिळाली.
निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी प्रशासकीय सेवा आणि स्पर्धा परीक्षांबाबत सुरुवातीलाच मार्गदर्शन केले. डॉ. राजेंद्र बर्वे यांनी निकालानंतर निर्माण होणारी ताणतणावाची परिस्थिती कशी हाताळावी, करिअरचा विचार करताना लक्ष्य कसे निश्चित करावे याबाबत मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य, करिअर निवडताना वेगळा विचार करण्याचे महत्व हे विविध खेळ व कृतींद्वारे समजावून सांगितले. संशोधन क्षेत्र आणि त्यामधील संधींबाबत डॉ. अनिकेत सुळे यांनी मार्गदर्शन केले. एखादा विषय समजून घ्यायचा असल्यास दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून राहता येणार नाही. तुम्ही शोध घेऊन, तुमच्या शब्दात व्यक्त करता आले पाहिजे, ही गोष्ट अधोरेखित केली.
केतन जोशी यांनी करिअरवरील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाचा भविष्यवेध घेत, समाजमाध्यम क्षेत्रातील संधीबाबत उपस्थितांशी संवाद साधला. नवीन शैक्षणिक धोरणामुळे यंदापासून लागू होणाऱ्या बदलांचे तपशील डॉ. नितीन करमळकर यांनी मांडले. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड यांनी दिली. कला, विज्ञान, वाणिज्य, इंजिनीअिरग, मेडिकल यापलीकडे जाऊन इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत? याबाबत विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले.
आजही तज्ज्ञांचे मार्गदर्शन..
‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत आज (शनिवारी) विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ९.३० वाजता रवींद्र नाटय़ मंदिर येथे कार्यशाळेला प्रारंभ होईल. सुरुवातीलाच प्रशासकीय सेवांमधील संधी व स्पर्धा परीक्षांच्या जगाबाबत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे उपस्थितांशी संवाद साधतील. उच्च शिक्षणाच्या संधींबाबत विवेक वेलणकर, निकालानंतरची ताणतणावाची परिस्थिती कशी हाताळावी व मानसिक आरोग्य कसे जपावे याबाबत डॉ. हरीश शेट्टी, संशोधन क्षेत्र व त्यामधील करिअरच्या संधींबाबत आयसरचे डॉ. अरविंद नातू, समाजमाध्यमे व कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत केतन जोशी आणि नवीन शैक्षणिक धोरण व यामुळे शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांबाबत डॉ. नितीन करमळकर हे संवाद साधणार आहेत. प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील.
डॉ. कश्मिरा संखे हिचा उपस्थितांशी संवाद
केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे हिने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत उपस्थितांशी संवाद साधला. चिंतेऐवजी चिंतन करून कसा मार्ग काढता येईल याचा विचार मी सातत्याने करत होते. ‘रीड- रिपीट- रीप्रोडय़ूस’ या सूत्राचा अवलंब केला. माझ्या वैद्यकीय शिक्षणाप्रमाणे मी या प्रवासातही नोट्स काढल्या. ५० मिनिटे अभ्यास केल्यानंतर, १० मिनिटांची विश्रांती घ्यायचे. या विश्रांतीच्या काळात मी अभ्यासाचा जराही विचार केला नाही, माझे विविध छंद जोपासले. छंद जोपासल्यामुळे तुमचे मन ताजेतवाने राहते. तर पालकांनाही आपल्या पाल्याला सकारात्मक पाठिंबा द्यावा, हा पाठिंबा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो’, असे कश्मिराने सांगितले.