Mahim Assembly constituency 2024 Sada Sarvankar : माहीम विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. हा विधासभा मतदारसंघ व लोकसभा मतदारसंघ देखील शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार अनिल देशाई येथून विजयी झाले आहेत. १९८९ पासून या मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. केवळ २००९ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते. तर, १९९० पासून या विधानसभा मतदारसंघावरही शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र, २००९ मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई येथून आमदार म्हणून निवडून आले होते. सदा सरवणकर हे येथील विद्यमान आमदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतर सरवणकर एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत. त्यामुळे महायुतीत शिवसेना (शिंदे) या जागेची मागणी करेल. महायुतीमधील इतर पक्ष शिंदेंच्या पक्षाच्या या मतदारसंघावरील दावेदारीला विरोध करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदा सरवणकर येथून शिवसेनेचे (शिंदे), पर्यायाने महायुतीचे उमेदवार असू शकतात. मात्र महाविकास आघाडी येथून कोणाला उमेदवारी देणार हे मात्र अद्याप निश्चित नाही.
माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly constituency) शिवसेनेप्रमाणे मनसेचेही हजारो मतदार आहेत. २००९ साली मनसेने हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावला होता. तसेच मागील दोन्ही विधासभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला, म्हणजेच सदा सरवणकरांना सहज विजय मिळू दिला नाही. मागील दोन्ही निवडणुकीत माहीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. यंदा देखील अशीच लढत येथे पाहायला मिळणार. मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला मनसे महायुतीत सहभागी झालेली नाही. सध्या तरी हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता कोणत्याही पक्षाने वर्तवलेली नाही. ही युती झाली नाही तर या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.
मनसेची रणनिती काय?
महायुतीत महाीम मतदारसंघ (Mahim Assembly constituency) शिवसनेच्या (शिंदे) वाट्याला येईल अशी शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत मात्र या मतदारसंघावर शिवसेना (ठाकरे) दावा करेल. त्यांना काँग्रेसकडून विरोध होऊ शकतो. मात्र काँग्रेसचा येथे फार मोठा मतदारवर्ग नाही. त्यामुळे माहीममध्ये यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगू शकतो. मनसेकडून संदीप देशपांडे व माजी आमदार नितीन सरदेसाई हे येथून उमेदवारीसाठी इच्छूक असतील. संदीप देशपांडे यंदा वरळी विधानसभा मतदारसंघातही मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे माहीममध्ये सरदेसाई व वरळीत देशपांडे हे दोघे मनसेच्या तिकीटावर विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात.
हे ही वाचा >> वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलारांचा गड मजबूत, सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मविआसमोर मोठं आव्हान
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Mahim Assembly constituency)
सदा सरवणकर (शिवसेना) – ६१,३३७ मतं
संदीप देशपांडे (मनसे) – ४२,६९० मतं
प्रवीण नाईक (काँग्रेस) – १५,२४२ मतं
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Mahim Assembly constituency)
सदा सरवणकर (शिवसेना) – ४६,२९१ मतं
नितीन सरदेसाई (मनसे) – ४०,३५० मतं
विलास आंबेकर (भाजपा) – ३३,४४६ मतं
हे ही वाचा >> बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंसाठी अवघड पेपर? महायुतीकडून सुरंग लावण्याचा प्रयत्न, मनसे व शिंदेंनी समीकरणं बदलली
२००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Mahim Assembly constituency)
नितीन सरदेसाई (मनसे) – ४८,७३४ मतं
सदा सरवणकर (काँग्रेस) – ३९,८०८ मतं
आदेश बांदेकर (शिवसेना) – ३६,३६४ मतं
ताजी अपडेट
माहिम मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण १९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच अर्ज बाद करण्यात आले आहेत. एकूण १४ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यानुसार मनसेने पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेनेने (शिंदे) विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेने (ठाकरे) येथून महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. माहीममधील मतदारसांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.