Sada Sarvankar Viral Social Post: शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे माहीम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सदा सरवणकर सध्या चर्चेत आहेत. माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील भाजपा व शिवसेना या घटकपक्षांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण सदा सरवणकर यांनी मात्र उमेदवारीवर ठाम राहात असल्याचं स्पष्ट केलं आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे सदा सरवणकर यांच्या नावाने एक खोटी पोस्ट व्हायरल होत असून त्यावर खुद्द सरवणकर यांनीच स्पष्टीकरणादाखल पोस्ट केली आहे.

नेमकं काय घडलं?

‘लोकसत्ता डॉट कॉम’कडून पब्लिश करण्यात आलेल्या एका सोशल पोस्टमधील मजकूर बदलून त्या ठिकाणी सदा सरवणकर यांच्या तोंडी भलतंच वाक्य टाकण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याबाबतीत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी स्वत:च त्याबाबत स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. यामध्ये ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं पब्लिश केलेली मूळ पोस्ट व त्याच्या मजकुरात बदल करून व्हायरल केली जात असलेली पोस्ट या दोन्ही पोस्ट त्यांनी शेअर केल्या आहेत.

व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलंय?

सदा सरवणकर यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये ते उद्धव ठाकरेंचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. “आज जेव्हा माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येतो, तेव्हा मला उद्धव ठाकरे आठवतात. त्यांची साथ सोडली त्याचे परिणाम मी आज भोगतोय. सत्ता असेल-नसेल, पण उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, असं वाक्य या व्हायरल पोस्टमध्ये सदा सरवणकर यांच्या तोंडी घालण्यात आलं आहे.

‘लोकसत्ता’च्या मूळ पोस्टमध्ये काय म्हटलंय?

दरम्यान, लोकसत्ताने असं कोणतंही वाक्य सरवणकरांचं म्हणून शेअर केलं नसून मूळ पोस्ट वेगळी आहे. ही पोस्टदेखील सरवणकर यांनी शेअर केली आहे. “माहीम विधानसभेतील प्रत्येक गल्लीत, घरात माझ्या कामामुळे माझी ओळख निर्माण झाली आहे. काम करणाऱ्या व्यक्तीवर कुणी अन्याय करत असेल, तर त्यावर निश्चितच प्रतिक्रिया उमटणार आणि मतदारसंघातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत”, असं मूळ पोस्टमध्ये नमूद आहे.

सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण

दरम्यान, सदा सरवणकर यांनी याबाबत स्पष्टीकरणदेखील दिलं आहे. “आपली विकासकामे, ‘उबाठा’चे खोटे कारनामे…खोटे लोक, खोटंच पसरवणार…सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका क्रिएटिव्ह पोस्टमध्ये मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात ‘लोकसत्ता’चे नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. मी जनतेच्या माझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल बोललो. पण ते खोडून उद्धव ठाकरे यांच्याविषयी विधान केल्याचा दावा या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या क्रिएटिव्हमध्ये करण्यात आला आहे. परंतु अशा प्रकारे कुठलीही प्रतिक्रिया मी दिलेली नाही आणि लोकसत्तानेही अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही. या खोडसाळपणाची तक्रार ‘सायबर क्राइम’ शाखेकडे करण्यात येणार आहे”, असं सरवणकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

राजकीय पटलावर काय घडतंय?

सदा सरवणकर यांची मनधरणी करण्यासाठी आज खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून समजूत काढली. त्यानंतर सरवणकर वर्षा निवासस्थानी गेले. तिथून ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठीही निघाले. पण राज ठाकरेंनी आपल्याला भेट नाकारून इतर नेत्यांना भेटण्यास सांगितल्याचा दावा सरवणकर यांनी केला आहे. तसेच, अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी मागे न घेता निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader