मुंबई : मोलकरणीने घरातील तब्बल पावणेतीन लाख रुपये किमतीच्या हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना बुधवारी घाटकोपर परिसरात घडली. पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सदर महिलेला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घाटकोपरच्या हिंगवाला लेन परिसरात वास्तव्यास असलेले गौरव बोटारा यांच्या घरात मोलकरणीनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. दिवाळीनिमित्त गौरव यांच्या पत्नीला दागिने घालायचे होते. त्या मंगळवारी सायंकाळी घरातील कपाटात ठेवलेले दागिने काढण्यासाठी गेल्या. मात्र कपाटातील दागिन्यांचा डब्बाच गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डब्यात हिऱ्याचे आणि सोन्याचे सुमारे पावणेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने होते. त्यांनी घरात दागिन्यांचा शोध घेतला. मात्र दागिने कुठेच सापडले नाहीत.

हेही वाचा >>>अति पावसामुळे कापूस उत्पादनात घट; सात टक्क्यांनी घट होण्याचा सीएआयचा अंदाज

गौरव यांच्या घरी अनेक वर्षांपासून एक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. तिने ही चोरी केल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. मात्र ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. अखेर गौरव यांनी बुधवारी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर मोलकरणीला गुरुवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.