लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या २४१७ घरांसाठी सहा लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने या सहा लाख रुपयांच्या घरासाठी महिना ४ हजार ६४० रुपयांप्रमाणे वार्षिक ५५ हजार ६८० रुपये देखभाल शुल्क निश्चित केले होते. मंडळाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत लाभार्थी गिरणी कामगार आणि त्यांच्या संघटनांनी सरसकट विजेत्यांचे देखभाल शुल्क माफ करण्याची मागणी केली होती. शुल्क माफ करण्याची मागणी मंडळाने मान्य केली नसली तरी २०२५-२६ च्या वार्षिक देखभाल खर्चात कपात केली आहे. त्यानुसार आता २०२५-२६ साठी महिना ३५९४ रुपयांप्रमाणे ४३ हजार १२८ रुपये इतके देखभाल शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र गिरणी कामगारांना ही कपात अमान्य असून शुल्कमाफीवर ते ठाम आहेत.

एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरांच्या प्रकल्पातील २४१७ घरांसाठी मुंबई मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली. या घरांसाठी सहा लाख रुपये विक्री किंमत निश्चित करण्यात आली. मात्र विविध कारणांमुळे ताबा रखडल्याने तब्बल आठ वर्षांनंतर पात्र विजेत्या गिरणी कामगारांना घर देण्यास मागील वर्षापासून मुंबई मंडळाने सुरुवात केली. आठ वर्षांनंतर घराचा ताबा मिळणार असल्याने विजेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र विजेत्यांना २०२४-२५ साठी वार्षिक ४२ हजार १३५ रुपये देखभाल शुल्क आकारण्यात आले. देखभाल शुल्कामुळे विजेत्या कामगार आश्चर्यचकीत झाले. आकारण्यात आलेले भरमसाठ देखभाल शुल्क कामगारांना आर्थिक अडचणीत टाकणारे असल्याने त्याला विरोध झाला. गिरणी कामगार संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली. या नाराजीची दखल घेत मुंबई मंडळाने २०१८ ते २०२२ दरम्यान घराची विक्री किंमत म्हाडाकडे अदा केलेल्या अंदाजे ९०० विजेत्या कामगारांचे दोन वर्षांचे देखभाल शुल्क माफ करून त्यांना दिलासा दिला. काही दिवसांपूर्वी मंडळाने २०२५-२६, २०२६-२७ आणि २०२७-२८ साठी शुल्क जाहीर केले आहे.

मंडळाने २०२५-२६ वर्षाकरीता ५५ हजार ६८० रुपये, २०२६-२७ करिता ६१ हजार २६० रुपये आणि २०२७-२८ करिता ६८ हजार ३८० रुपये असे देखभाल शुल्क निश्चित केले होते. याबद्दल विजेत्यांनी नाराजी व्यक्त करीत हे शुल्क माफ करण्याची मागणी केली. या मागणीनंतर गेल्या आठवड्यात देखभाल शुल्कात कपात करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. मंडळाच्या निर्णयानुसार २०२५-२६ साठी महिना ३५९४ रुपयांप्रमाणे वार्षिक ४३ हजार १२८ रुपये देखभाल शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी ते वार्षिक ५५ हजार ६८० रुपये होते. तर २०२६-२७ साठी आता प्रती महिना ३९५३ रुपयांप्रमाणे वार्षिक ४७ हजार ४३६ रुपये देखभाल शुल्क आकारण्यात येणार आहे. या वर्षासाठी ते ६१ हजार २६० रुपये होते. २०२७-२८वर्षासाठी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

मंडळाकडून लवकरच बदलण्यात आलेल्या देखभाल शुल्क दराबाबतची अधिकृत माहिती विजेत्यांना दिली जाणार आहे. याबाबत काही विजेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपणास अद्याप म्हाडाकडून देखभाल शुल्कात कपात केल्याबद्दल काही कळविले नसल्याचे सांगितले. शुल्क कपात केली असली तरी ती आम्हाला मान्य नाही. सर्व विजेत्यांचे संपूर्ण देखभाल शुल्क माफ करावे, अशी आमची मागणी असल्याचेही एका विजेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader