खासगीकरणाच्या माध्यमातून नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाची दिमाखदार वास्तू उभारण्यात आली असली तरी या इमारतीची देखभाल आणि निगा राखण्याकरिता होणाऱ्या खर्चाचा बोजा राज्य सरकारला पेलावा लागणार आहे. परिणामी खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या या इमारतीचे पुन्हा एकदा खासगीकरण करावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
उद्घाटन समारंभाच्या वेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बोलायला उभे राहिले आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने राज्याची चांगलीच नाचक्की झाली. राष्ट्रपती भवनने त्याची गंभीर दखल घेत अहवाल मागविला आहे. यामुळेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी नवी दिल्लीत सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. वीज पुरवठा कशामुळे खंडित झाला व जनरेटर तात्काळ सुरू का झाले नाहीत, याबाबत विचारणा करण्यात आली. या इमारतीच्या देखभालीचे काम असलेल्या अभियंत्यावर सारे प्रकरण शेकेल अशी चिन्हे आहेत. या संदर्भात मुख्य सचिवांना अहवाल देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
सुमारे १५० कोटी खर्चून ही इमारत खासगीकरणातून उभारण्यात आली. आता या इमारतीची देखभाल आणि निगा राखण्याचे काम सरकारला करावे लागणार आहे. मलबार हिलवरील सह्य़ाद्री अतिथीगृह आणि नवी दिल्लीतील जुने महाराष्ट्र सदन या इमारतींच्या देखभालीवर सरकारला दरवर्षी सात ते आठ कोटी खर्च करावे लागतात. नव्या महाराष्ट्र सदन इमारतीच्या देखभालीवर आणखी खर्च होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर हॉटेल व्यवसायातील एखाद्या मोठय़ा कंपनीला खासगीकरणातून महाराष्ट्र सदन चालविण्यास द्यावे, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मांडला आहे.
लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, शाहू महाराज यांचा विसर का?
छगन भुजबळ यांना दिवाकर रावते यांचे पत्र
विशेष प्रतिनिधी, मुंबई</strong>
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि वाद हे समीकरण ठरलेले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामापासून ते उद्घाटनापर्यंत वाद झाले. या सदनाच्या भव्य प्रांगणात बसविण्यात आलेल्या पुतळ्यांवरूनही आता वाद निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य पुतळे या ठिकाणी असले तरी ज्यांच्या नावाशिवाय राष्ट्रवादीचे नेते आपले भाषण सुरू करीत नाहीत त्या शाहू महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा पुतळा बसविण्यास भुजबळ कसे विसरले, असा सवाल शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केला आहे.
ज्यांच्यामुळे तुम्ही घडलात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवणे तुमच्यासारख्या हिम्मतबाजाकडून का घडले नाही, असा सवालही रावते यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळाही या प्रांगणात आवश्यक होता. परंतु त्यांचा पुतळा का नाही, हे ‘गांधीवादी’ सरकारला विचारणे हाच मूर्खपणा ठरेल, असा टोलाही रावते यांनी पत्रात लगावला आहे.