रसिका मुळ्ये
कोणत्याही क्षणी डोक्यात कोसळेल असे छताचे प्लास्टर, भिंतींना कधी रंग काढला होता का अशी शंका यावी अशा काळवंडलेल्या भिंती, खिडक्यांची तावदाने फुटलेली अशी दुरवस्था सध्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहाची झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने काहीही पाऊल उचलले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषदेकडून (नॅक) ‘अ (+)’ श्रेणी मिळवण्यासाठी मोठमोठय़ा योजना आखणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाला पायाभूत सुविधांची कमतरता नजरेस पडत नसल्याचे दिसत आहे. मुळातच विद्यापीठाकडे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ पाहता त्या तुलनेत विद्यापीठाने अजूनही विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे उपलब्ध करून दिलेली नाहीत. मात्र आहेत त्या वसतिगृहांच्या दुरुस्तीची तसदीही विद्यापीठाने घेतलेली नाही. चर्चगेट येथील जगन्नाथ शंकरशेट वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली आहे.
वसतिगृहाच्या दुरवस्थेचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. नुकतीच एका खोलीत विद्यार्थी लॅपटॉपवर काम करत असताना त्याच्या लॅपटॉपवर छताचे प्लास्टर पडून नुकसान झाले.
इमारतीच्या जिन्यांच्या फरशा काही ठिकाणी उखडल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. त्यामुळे डास, कीटक इमारतीत येतात. स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना झोपण्याचे दिलेले पलंग, कपाटे सुस्थितीत नाहीत. पिण्याच्या पाण्याचा कुलर गंजला आहे. त्याची स्वच्छताही होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अशुद्ध पाणी पिऊन त्रास झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
‘वसतिगृहाच्या अवस्थेबद्दल एप्रिल महिन्यात विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाने अजूनही या इमारतीकडे लक्ष दिले नाही. आता विद्यार्थ्यांच्या लॅपटॉपचे नुकसान झाले. अजून गंभीर परिस्थिती उभी राहण्याची वाट विद्यापीठ पाहात आहे का?’ असा प्रश्न एम.फिलचे विद्यार्थी शोमितकुमार साळुंके यांनी उपस्थित केला आहे.