प्रसाद रावकर
जॉगिंग ट्रकवर वाहन, फेरीवाल्यांचा ठिय्या
मुंबई : मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळेल अशा पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च केले. मात्र सुशोभीकरण प्रकल्पात उभारलेले संगीताच्या तालावर उडणारे कारंजे, धावण्यासाठी तयार केलेली स्वतंत्र मार्गिका, लोखंडी कठडे यांची देखभालीअभावी वाताहत झाली आहे. तलावामध्ये अस्ताव्यस्तपणे पसरलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. तलाव दुर्लक्षित झाल्याने आतापर्यंत सुशोभीकरणासाठी खर्च केलेले कोटय़वधी रुपये पाण्यात गेले आहेत.
पवई गावातील पाण्याची गरज लक्षात घेऊन १८९१ मध्ये पवई तलाव बांधण्यात आला. मुंबईमधील तीन तलावांपैकी हा एक तलाव. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या पवई तलावाच्या एका बाजूला वृक्षवल्लींनी नटलेला परिसर आणि टेकडी दृष्टीस पडते. तर तलावाजवळच जलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहिला. तलावाच्या आसपासच्या भागात कालौघात इमारती उभ्या राहिल्या आणि हळूहळू या तलावाचा ऱ्हास सुरू झाला. तलावातच मलजल सोडण्यात आल्याने पाणी दूषित होऊ लागले. पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर पालिकेने तलावामध्ये जाणारे मलजल रोखण्याची योजना हाती घेतली. त्याचसोबत तलावाच्या आसपासच्या परिसराचे सुशोभीकरणही हाती घेतले. सकाळी आणि सायंकाळी तलावाकाठी नागरिकांना फेरफटका मारता यावा यासाठी पदपथाची व्यवस्था करण्यात आली, तर धावण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात आली. पदपथाच्या कडेला लोखंडी कठडे उभारण्यात आले. त्याचबरोबर तलावाच्या आकर्षणात भर घालण्यासाठी संगीताच्या तालावर आकाशात उडणारे कारंजेही तेथे बसविण्यात आले. ही योजना राबविल्यानंतर तलावाचे रूप अधिक खुलून दिसू लागले, पण या सर्वाची गेल्या काही वर्षांमध्ये धावण्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र मार्गिकेवर वाहने उभी केली जात आहेत. काही ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरण्यास सुरुवात केली आहे. तलावाच्या काठाच्या बाजूला कोणतेच बांधकाम नव्हते, पण आता तेथे काही गाळे उभे राहिले आहेत. धार्मिक विधीचे साहित्य तलावाजवळच फेकून देण्यात येते. धावण्यासाठी बांधलेली मार्गिका ओलांडून वाहने थेट छोटय़ा विसर्जनस्थळापर्यंत जाऊ लागली आहेत. संगीताच्या तालावर उडणाऱ्या कारंज्याची पूर्णत: वाताहत झाली आहे.
पवई तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प पालिकेने राबविला होता, परंतु देखभालीअभावी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे दिसते. तलावातील जैवविविधता लक्षात घेऊन तेथे संगीताच्या तालावर उडणारे कारंजे बसविण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पालिकेने कारंजे उभारले. तलावात फोफावणारी जलपर्णी हटविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, पण त्याकडे मात्र पालिका दुर्लक्ष करीत आहे. तलावाच्या सुशोभीकरणाची योजना आखताना नागरिकांच्या सूचना आणि हरकतीही लक्षात घेणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही.
– सुनिष सुब्रमण्यन कुंजु, पर्यावरणप्रेमी
जलपर्णीमुळे जैवविविधता धोक्यात
गेल्या अनेक वर्षांपासून या तलावात अस्ताव्यस्त पसरलेली जलपर्णी हटविण्यात आलेली नाही. आजघडीला जलपर्णीचे बेसुमार साम्राज्य पसरले आहे. जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी या तलावामधून गाळ उपसण्यात आला होता. तलावामध्ये छोटेखानी बेटासारखे मोठाले दगड होते. गाळ उपसताना तेही हटविण्यात आले. या तलावांमध्ये मगरी विहार करीत असतात. या दगडांवर त्या तासन्तास बसलेल्या दृष्टीस पडत होत्या. परंतु हे दगड हटविल्यानंतर अचानक तलावात मगरींचे दर्शन दुर्लभ झाले, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.