मुंबई : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेर ५८ लाख ६८ हजार ७२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका, करडईच्या क्षेत्रात वाढ तर ज्वारीच्या पेरणीत घट झाली आहे. जानेवारीअखेर रब्बीतील पेरण्या होतात, त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. गत वर्षी ४८ लाख ६५ हजार ३२० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा डिसेंबरअखेर ५८ लाख ६८ हजार ७२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १०८ टक्के तर गत वर्षाच्या तुलनेत १२१ टक्के पेरणी झाली आहे. ऊसतोडणी होईल तसे उशिराने मका, हरभऱ्यासह अन्य चारा पिकांची लागवड जानेवारीअखेरपर्यंत होत असते. त्यामुळे यंदा रब्बीत विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री अन्न आणि आरोग्यादायी म्हणून ज्वारीची प्रचार – प्रसिद्धी होत असली तरीही ज्वारीच्या लागवडीत घट झाली आहे. रब्बीतील ज्वारीचे क्षेत्र सरासरी १७.५० लाख हेक्टर आहे. गतवर्षी १३.६४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा १४.५२ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बीतील अन्य पिकांनी सरासरी ओलांडली असली तरीही ज्वारीच्या लागवडीने जेमतेम सरासरीच्या ८३ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. यापुढे ज्वारीच्या लागवडीत फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. गव्हाच्या लागवडीने सरासरी गाठली आहे. दहा लाख हेक्टरवर लागवड होते, यंदा ११.३६ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे.

हेही वाचा…वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त

मका लागवडीने मोठी गती घेतली आहे. इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढल्यामुळे दर ३० रुपये किलोपर्यंत गेल्याचा परिणाम मका लागवडीवर झाला आहे. रब्बीत सरासरी २.५८ लाख हेक्टर क्षेत्र असताना ४ लाख ३० हजार २६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेर सरासरीच्या १६६ टक्के पेरणी झाली आहे, त्यात आणखी वाढीचा अंदाज आहे. एकूण तेलबियांची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली असली तरीही करडईच्या पेरण्यांनी आघाडी घेतली आहे. करडईचे सरासरी क्षेत्र २६ हजार हेक्टर आहे, यंदा ३१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरीच्या लागवडीने अद्याप सरासरी गाठली नाही.

हेही वाचा…बॉलिवूड कलाकारांनी परदेशात केले नववर्षाचे स्वागत

पेरणी क्षेत्रात आणखी वाढ शक्य

पावसाळ्यात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील पेरण्यांनी गती घेतली आहे. शेतकरी ऊसतोडणीनंतर लागवडी करतात, त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत पेरण्या होतील. यंदा रब्बीत विक्रमी क्षेत्रावर पेरण्या होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी संचालक ( विस्तार आणि विकास) रफिक नायकवडी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maize and sorghum area increased while sorghum sowing decreased record rabi sowing expected mumbai print news sud 02