लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सध्या बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेतील कारशेडचा अडसर अखेर दूर झाला आहे. मेट्रो ६ च्या (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा ताब्यात आल्यानंतर इतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रियाही आता सुरु झाली आहे. त्यानुसार मेट्रो ४, ४ अ (वडाळा ते गायमुख), १०(गायमुख ते मिरारोड) या मार्गिकांसाठी मोघरपाड्याची १५० हेक्टर जागा लवकरच एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. मेट्रो ९ (दहिसर ते मिरारोड) मार्गिकेसाठी डोंगरी येथील ५९ हेक्टर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या वॉर रूममध्ये या दोन्ही कारशेडच्या जागेला मान्यता देण्यात आली. त्यानुसार जागा ताब्यात घेण्यात येत आहे. त्याचवेळी मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) मार्गिकेच्या कारशेडसाठी कशेळी येथील जागाही ताब्यात घेण्यात येणार आहे.

एमएमआरडीएकडून ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील अनेक मार्गिकांची कामे सुरू आहेत. त्यात मेट्रो ४,४अ, मेट्रो १०, मेट्रो ५, ६,९ मार्गिकांचा समावेश आहे. तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेचे बांधकाम केले जात आहे. या सर्व मार्गिकांची कामे वेगात सुरु असताना कारशेडचा प्रश्न मात्र मार्गी लागत नव्हता. आता मात्र सर्व मार्गिकांतील कारशेडचा प्रश्न निकाली निघाला आहे. मेट्रो ३ ची कारशेड आरेत हलविण्यात आली असून सध्या कारशेडचे काम वेगात सुरु आहे. त्याचवेळी मेट्रो ३ नंतर मेट्रो ६ च्या कारशेडच्या जागेचा प्रश्नही बराच क्लिष्ट झाला होता. पण हा प्रश्नही आता सुटला आहे. मेट्रो ६ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली असून लवकरच तेथे कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- इगतपुरी येथे समृद्धी महामार्गावर पूल किंवा पुलाचा भाग कोसळलेला नाही, एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण

सर्वाधिक वादग्रस्त कारशेड मार्गी लागल्यानंतर आता इतर मार्गिकांच्या कारशेडच्या जागेचाही प्रश्नही मार्गी लागला आहे. एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो ४,४ अ, १० साठीच्या मोघरपाड्यातील जागेला तसेच मेट्रो ९साठी उत्तनमधील डोंगरी गावातील जागेला नुकतीच राज्य सरकारच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यानुसार डोंगरी येथील सिटी सर्व्हे क्रमांक १८ मधील ५९ हेक्टर आणि मोघरपाडा येथील १५० हेक्टर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेट्रो ५ च्या कारशेडसाठी कशेळी येथील २७ हेक्टर जागाही लवकरच एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. एकूणच मेट्रो ३, ४, ४अ, १०, ५, ६ आणि ९ या मार्गिकांतील कारशेडच्या जागेचा अडसर आता दूर झाल्याने मेट्रो मार्गिकेचे काम वेगात पुढे जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major hurdle of car shed in metro project is finally removed mumbai print news mrj