मुंबई : गेल्या पन्नास वर्षांत देशातील गिघाडांसह अन्य जातींच्या पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. १९९२ ते २०२२ या काळात पांढऱ्या रंगाचे गिधाडांची संख्या ९८ टक्क्यांनी आणि भारतीय गिधाडांसह सडपातळ गिधाडांची संख्या ९३ टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी धक्कादायक माहिती लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०२४ मधून समोर आली आहे.
हेही वाचा >>> माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
देशातील विविध जातींच्या पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. या अहवालात भारतातील पक्ष्यांची स्थिती आणि संख्येविषयी वेगळा विभाग करण्यात आला आहे. लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०२४ मधील माहितीनुसार, १९८० च्या तुलनेत २०२४ मध्ये देशातील पक्ष्यांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. प्रामुख्याने जनावरांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डायक्लोफेनाक, एसेक्लोफेनाक, केटोपोर्फेन आणि नाइमसुलाइड औषधांमुळे गिधाडांच्या संख्येत घट होत आहे. पशूवैद्यक आणि पशूपालकांमध्ये या औषधांबाबत व्यापक जागृती करूनही गिधाडांचा ऱ्हास रोखता आला नसल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या जाळ्याचा ही विपरीत परिणाम होताना दिसत आहे. विजेचा धक्का लागून अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो आहे.
हेही वाचा >>> कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
वाढते शहरीकरण, नागरीकरण आणि शेतीसाठी गवताळ कुरणे, झुडपांची कुरणे, जंगले आणि पाणथळ जांगाचा ऱ्हास होत असल्यामुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक आधिवासाचा ऱ्हास होत आहे. देशातील बहुपीक पद्धतीचा वेगाने ऱ्हास होत आहे. नगदी पिकांची लागवड वाढली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे भक्ष्य असलेल्या किटकांची संख्या वेगाने कमी होत आहे. खाद्यांचा अभाव हे ही पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होण्याचे किंवा पक्ष्यांनी स्थलांतर करण्याचे प्रमुख कारण आहे. लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०१६ नुसार, जगातील २२ देशांमध्ये गवताळ कुरणांचा ऱ्हास झाल्यामुळे फुलपाखरांच्या एकूण प्रजातींपैकी ३३ टक्के प्रजातींमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. ओडिशातील मधमाश्यांच्या संख्येत ८० टक्क्यांनी घट झाली आहे.
तातडीने उपाययोजनांची गरज
पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत असल्याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येत आहे. देशांतील पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहेच, त्या शिवाय देशात येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येतही घट दिसून येत आहे. पक्ष्यांच्या संख्येतील घट हे गभीर संकट म्हणून समोर आले आहे. तातडीने एकात्मिक उपाययोजनांची गरज आहे, असे मत इला फाउंडेशनचे संचालक, पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.
* पक्ष्यांच्या संख्येत घट होण्याची कारणे…
* पशुधनामध्ये उपचारासाठी वापरली जाणारी औषधे गिधाडांसाठी हानीकारक.
* देशात गिधाडांच्या संरक्षणासाठी एसेक्लोफेनाक आणि केटोप्रोफेन या औषधांवर बंदी घालून ही अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत.
* उच्च दाबाच्या वीजवाहिनींच्या धक्क्यामुळे जीवितहानी
* गवताळ कुरणे, पाणथळ ठिकाणे, जंगले कमी झाल्यामुळे गिधाडांसह पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
* ओडिशामध्ये २००२ पासून मधमाश्यांच्या संख्येत ८० टक्के घट* पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे जैवविविधता नष्ट होण्याची भीती