मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आयोजित दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला अलोट गर्दी झाली होती. मात्र, या गर्दीमधील बहुसंख्य जण मुंबई पाहण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. मुंबई पहिल्यांदाच पाहतोय, अशी भावना एमएमआरडीए मैदानात आलेल्या अनेकांनी व्यक्त केली.
बुधवारी सकाळपासून राज्यासह देशातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमत होती. मात्र, या गर्दीच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येत होती. आपण कशासाठी आलो आहे, कुठे फिरत आहे, पुढे काय होणार आहे, याची काहीही माहिती त्यांना नव्हती. तर, एकनाथ शिंदे यांचे विचार, हिंदूत्वाचे विचार ऐकण्यासाठी आलो आहे, असे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
वांद्रे-कुर्ला संकुलात कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु होती. मात्र, सकाळपासून कोणतीही जोरदार घोषणाबाजी, जयजयकार झाला नाही. संतोष बांगर यांचे शक्तिप्रदर्शन वगळता, कोणताही जल्लोष नव्हता. कोणाच्याही भाषणाला शिट्टय़ा, टाळय़ा वाजण्याचे प्रमाण कमी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आल्यावर काही प्रमाणात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी झाली. परंतु, त्यानंतर जैसे-थे परिस्थिती दिसून आली.
छात्रभारती संघटनेकडून निषेध
एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शंभरपेक्षा जास्त गाडय़ांना पोस्टर लावून छात्रभारतीने शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खासगी बसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत शून्य ते वीस पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या सरकारचा निर्णयाचा निषेध व्यक्त केला. एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गतीह्ण, शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नकाह्ण, जिल्हा परिषदेची मुले लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळाह्ण बसला भरले १० कोटी, शिक्षण नेले मागे आश्वासन खोटीह्ण, अशा आशयाचे स्टिकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला.
तरूणाची वारी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे कात्रज ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत सुमारे १७० किमीचे अंतर एका तरुणाने पायी पार केले. मूळचा बार्शीचा असलेल्या विजय घायतिडकने २ ऑक्टोबरला पुण्याहून पायीवारी सुरू केली. ४ ऑक्टोबर वांद्रे-कुर्ला संकुलच्या मैदानात पोहचले. सकाळी ६ वाजेपासून सुरुवात करून रात्री ९.३० पर्यंत पायपीट सुरू असायची. नवरात्री उपवास होता, तरी प्रवास केला. तसेच खांद्यावर १४ किलो वजनी फलक घेऊन विजयने पायीवारी केली.
संतोष बांगर यांचे शक्तिप्रदर्शन : शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात तब्बल दोन तास जोरदार गाणी लावून शक्तिप्रदर्शन केले. सभेच्या रस्त्यांवर युवकांनी बांगरांना त्यांच्या खांद्यावर उचलून जल्लोष केला. या रॅलीत भगवे झंडे घेऊन आम्हीच विचारांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडून सभेच्या स्थळी घोषणाबाजी करत सभेच्या ठिकाणी पोहचले.
लोकलमध्ये भाषण : पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या टीव्हीवर बुधवारी एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा थेट प्रक्षेपित दाखवण्यात आला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी बीडहून १०० बसमधून २० हजार लोक आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर हिंदूत्वाचे विचार एकनाथ शिंदे यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत मेळाव्यासाठी आलो.
– परमेश्वर बेदरे पाटील, बीड
हिंदूंसाठी लढणारा नेता संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली येथून आलो आहोत. एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकायला आलो आहे.
– बाळासाहेब सुरेगावकर, हिंगोली
सिल्लोडहून एसटीने आलो आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत आणले आहे. मुंबईत पहिल्यांदा आलो आहेत. फिरायला मिळेल, असे सांगून मी आलो आहे.
– फारूक शेख, सिल्लोड
वांद्रे-कुर्ला संकुलात ‘ठाकरे यांची’ सभा ऐकायला आलो आहे. बाकी काही माहिती नाही.
– राजू मुखने, पालघर
मुंबईत अनेक ठिकाणी फिरलो. सभेविषयी काही माहिती नाही.
– शरद तायडे, सिल्लोड, औरंगाबाद
आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत. हिंदूत्व तेच टिकवून ठेवू शकतात.
– सखाराम तांदळे, नंदुरबार
रिकाम्या बाटल्यांचा खच : दसरा मेळाव्यानिमित्त एमएमआरडीए मैदानावरनागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बाटलीबंद पाणी होते. त्यामुळे मैदानावर मोठय़ा प्रमाणावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा खच होता.
भाषणापूर्वीच गावाची वाट : एकनाथ शिंदे यांचे भाषण होण्याआधीच बाहेर गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी घरची वाट धरली. गावाकडे जाणाऱ्या बसजवळ उभे राहून आपापल्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू होती.