दा. कृ. सोमण यांची माहिती
मकरसंक्रांत ही नेहमी १४ जानेवारी रोजीच येते हा गैरसमज असून मकरसंक्रांत व १४ जानेवारी यांचा तसा काहीही संबंध नाही. या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
आणखी वाचा – मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण
२२ डिसेंबर रोजी सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासूनच दिवस मोठा होत जातो. पण आपल्याकडील पंचांगे निरयन पद्धतीवर आधारित असल्याने सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केला की मकरसंक्रांतीचा सण आपण साजरा करतो. यंदाच्या वर्षी १४ जानेवारी रोजी उत्तररात्री १ वाजून २६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने रात्री निरयन मकर राशीत प्रवेश केल्यामुळे मकरसंक्रांतीचा पुण्य काळ १५ जानेवारी रोजी आला आहे. दर ४०० वर्षांनी निरयन मकरसंक्रांत तीन दिवसांनी पुढे जाते. दरवर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंदाचा कालावधी साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. सन २०० मध्ये मकरसंक्रांत २२ डिसेंबर रोजी, १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. पुढे १९७२ पर्यंत मकरसंक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून १९८५ पर्यंत ती कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारी रोजी येईल, असेही सोमण म्हणाले.
आणखी वाचा – मकरसंक्रांत आणि उत्तरायण
२१०० पासून निरयन मकरसंक्रांत १६ जानेवारी रोजी येईल. अशा प्रकारे मकरसंक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात सन ३२४६ मध्ये मकरसंक्रांत १ फेब्रुवारी रोजी येणार आहे. मकरसंक्रांत ही अशुभ किंवा वाईट नसते. तोही गैरसमज असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.