मुंबई : लाकूड किंवा कोळसा जाळून त्यावर चालणाऱ्या बेकरी आणि भट्ट्या बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी त्यातून मुंबईतील इराणी कॅफे व बेकऱ्यांना सूट द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेने या अनेक वर्षे जुन्या बेकऱ्यांना नोटीसा द्यायला सुरूवात केली आहे. मात्र शंभर वर्षांची खाद्यपरंपरा जपणाऱ्या इराणी बेकरींना ऐतिहासिक वारसा म्हणून दर्जा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
लाकूड व कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणा-या भट्टी (बेकरी), हॉटेल्स्, उपाहारगृहे हे देखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने देखील ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सुनावणीत सहा महिन्यांच्या मुदतीत लाकूड व कोळसा इंधन आधारीत व्यावसायिकांनी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने या सर्व व्यावसायिकांना ८ जुलै २०२५ ची मुदत दिली आहे, तशा नोटीसाही पाठवल्या आहेत. या निर्णयाचे आता पडसाद उमटू लागले आहेत.
मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर इराणी कॅफे व बेकरी व्यावसायिक आहेत. गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या या बेकरीमध्ये लाकडावरील भट्ट्या पेटवून त्यावर पदार्थ बनवले जातात. शतकानुशतके जुना पाककृती इतिहास जपणाऱ्या या इराणी कॅफे, बेकऱ्यांना ऐतिहासिक वारसा दर्जा देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित इराणी कॅफे आणि बेकरीवर होणार आहे. शहराच्या खाद्य संस्कृती आणि इतिहासामध्ये या इराणी कॅफेचे मोठे योगदान आहे. हे कॅफे आणि बेकरी एका शतकाहून अधिक काळापासून मुंबईत आहेत. ते वापरत असलेल्या लाकडाच्या भट्ट्या हे त्यांच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत. या कॅफे ज्या पदार्थांसाठी ओळखले जातात त्यांची विशिष्ट चव आणि सुगंध हा लाकडावरील भट्ट्यांमुळेच येत असतो. लाकूड किंवा कोळसा न वापरता हे पदार्थ अन्य प्रकारच्या भट्टीत भाजल्यास पिढ्यान्पिढ्या जपलेल्या पाककृतीची चव बदलेल अशीही भीती नार्वेकर यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी, पारंपारिक स्वयंपाक पद्धतींचे संरक्षण करण्यासाठी ऐतिहासिक रेस्टॉरंट्सना नियमांपासून सूट आहे, तर नेदरलँड्समध्ये, शहरांच्या मध्यभागी असलेल्या शतकानुशतके जुन्या विंड मिल्स राष्ट्रीय वारसा म्हणून जतन केल्या जातात. इराणी कॅफे हे केवळ रेस्टॉरंट नाहीत तर मुंबईच्या पाककृती इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहेत. १९ व्या शतकात झोरास्ट्रियन इराणी स्थलांतरितांनी त्यांच्या पाककृती परंपरा मुंबईत आणल्या. आपल्या वारशाचा हा अविभाज्य भाग जपण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा व लाकूड आणि कोळशाच्या वापरावरील बंदीतून सूट देऊन या इराणी कॅफे, बेकऱ्यांना वारसा दर्जा देण्यात यावा. ,अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.